‘गोकुळ’ चा वर्तमान बोलणारी भिंत
schedule08 Apr 25 person by visibility 1028 categoryउद्योग

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने नुकतेच पेट्रोल विक्री व्यवसायात पदार्पण केले. त्यासाठीचा पहिला पेट्रोल पंप हायवेवर गोकुळच्या दूध प्रक्रिया केंद्रास लागूनच उभा केला. गोकुळच्या दूध आणि दुग्ध पदार्थातील गुणवत्तेबाबत ग्राहकात प्रचंड विश्वास आहे. गुणवत्तेबाबत तडजोड न करणारा पेट्रोल पंप म्हणून लवकरच याचा नावलौकिक होईल.
या पंपावर, पेट्रोल पंप आणि गोकुळ डेअरी यांचे दरम्यान, एक रिटेन्शन वॉल आहे. या भिंतीची उंची २५ फूट आहे, क्षेत्रफळ तब्बल ३३०० स्क्वेअर फुट आहे. चेअरमन अरुण डोंगळे यांना एक वेगळीच कल्पना सुचली. त्यांच्या मते, या भिंतीवर जाहिरात करण्यापेक्षा गोकुळच्या वर्तमानाची माहिती देणारी चित्र संगती मांडली तर तो गोकुळच्या उत्पादकाचा बहुमान ठरेल. त्यामुळे या भिंतीवर मुक्त गोठा पद्धती, वैरण विकास, गोकुळची गोबर से समृद्धी योजना, सायलेज चा वापर, पशुखाद्य वापर, स्वच्छ दूध उत्पादन, पशुपूजक संस्कृती, कष्ट करणारे उत्पादक, दुधाची वाहतूक करणारी यंत्रणा, स्लरी पासून गोकुळ तयार करत असलेले शेतीसाठी आधुनिक खत म्हणून वापरायचे सुधन हे उत्पादन, आयुर्वेदिक उपचार पद्धती, वासरू संगोपन इ. मांडावयाचे ठरले. तथापि एवढ्या मोठ्या भिंतीवर चित्ररूपी मांडणी करण्याचे आव्हान ही कठीण वाटत होते. बऱ्याच चित्रकारांनी हे नाकारले. पण आव्हान स्वीकारणार नाही, ते ही कलेच्या बाबतीत तर ते कोल्हापूर कसले. कोल्हापुरातील प्रसिद्ध कलाकार विजय उपाध्ये यांनी ते आव्हान स्वीकारले. गुढीपाडव्याला पंपाचे उद्घाटन करावयाचे असल्याने, आठ दिवसात ते काम संपवावे असे नवीन आव्हान विजय उपाध्ये यांना मिळाले. दळवीज आर्ट चे प्राचार्य अजेय दळवी आणि गोकुळचे सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम सुरू केले.
कलानिकेतन महाविद्यालय आणि दळवीज आर्ट या दोन्ही कॉलेजमधील दहा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन, रात्रंदिवस हे काम सुरू झाले. चित्रांची निवड, त्यांची योग्य मांडणी, भिंतीचा प्रचंड आकार लक्षात घेता वापरावयाचे रंग, टिकाऊपणासाठी कराव्या लागणाऱ्या तांत्रिक बाबी या सर्व कलात्मक आणि इतर बाजू लक्षात घेऊन अत्यंत वेगाने आणि कुशलतेने हे काम सुरू झाले. गोकुळचा दूध उत्पादकाच्या लोणी या पदार्थाची गोकुळने यंदा परदेशी निर्यात केली, त्याबद्दलही सांकेतिक चित्र या भिंतीवर अवतरले.
उद्घाटन समयी उपस्थित असणारे जिल्ह्यातील नेते मंडळी, ग्राहक, उत्पादक, वाहतूकदार, संचालक मंडळ, कर्मचारी यांनी या भिंतीवरील कलेचे भरभरून कौतुक केले. चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, "गोकुळच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून पेट्रोल भरायला तर आपण यालाच, पण कोल्हापुरातील एका गुणी कलाकाराची भव्य आणि सुंदर कलाकृती पाहायला, येथे कोल्हापूर व परिसर वासियांनी नक्की भेट द्यायला हवी." कोल्हापुरातील कलाकारांनी सुद्धा गोकुळचे वर्तमान बोलणाऱ्या भिंतीचे कौतुक केले.