हा अर्थसंकल्प नाही, तर जनतेची क्रूर थट्टा : आमदार सतेज पाटील
schedule01 Feb 26 person by visibility 93 categoryराज्य
केंद्र सरकारचा २०२६ चा अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांची धूळफेक आणि पोकळ घोषणांचा सुकाळ आहे. ज्यांच्या घरात चूल पेटते की नाही याची चिंता आहे, त्यांच्यासाठी हा अर्थसंकल्प म्हणजे एक क्रूर विनोद आहे. मनरेगाच्या बजेटमध्ये तब्बल ६५% कपात करून सरकारने लोकांच्या तोंडाचा घास पळवला. रोजगाराची हमी देणारी ही योजना या सरकारने उपासमारीची हमी देऊ केली आहे. अशी टीका विधानपरिषदेतील काँग्रेस गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी केली
ते म्हणाले, स्मार्ट सिटीच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी आता सिटी इकॉनॉमिक रिजन नावाचं नवीन गाजर दाखवलं जात आहे. एकीकडे तरुण बेरोजगार फिरत आहेत, उद्योगधंदे बंद पडत आहेत, गुंतवणूकदार देश सोडून जात आहेत आणि घराघरातली बचत संपत चालली आहे. बळीराजा संकटात आहे, मग कुणासाठी आहे हा अर्थसंकल्प?
कोल्हापूरसाठी तर या बजेटमधून भोपळा हाती लागला असून कोणतीच मोठी गोष्ट आपल्यासाठी दिलेले दिसत नाही. शिवाय, ज्या घोषणा केल्या आहेत त्यापैकी एकाचीही अंमलबजावणी कशी होणार याची स्पष्ट दिशा दिसत नाही. वाढत्या कर्जाच्या डोंगराकडे आणि येऊ घातलेल्या जागतिक संकटांकडे हे सरकार पूर्णपणे डोळेझाक करत आहे. हा अर्थसंकल्प वाचताना सरकारला सामान्य लोकांची पर्वा नाही हेच दिसून येते असे आमदार सतेज पाटील म्हणाले.