सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना! विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर
schedule29 Sep 24 person by visibility 376 categoryगुन्हे
मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे विजेचा तीव्र झटका लागल्याने बाप लेकासह एका चुलत चुलत्याचा मृत्यू झाला आहे. तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये परिसनाथ मारुती वनमोरे, त्यांचा मुलगा साईराज परिसनाथ वनमोरे आणि चुलत भाऊ प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे यांचा मृत्यू झाला. तर यामध्ये परिसनाथ वनमोरे यांचा मोठा मुलगा हेमंत वनमोरे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्घटना शेतामध्ये घडली या घटनेमुळे म्हैसाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
परिसनाथ वनमोरे हे म्हैसाळ येथे कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत. परिसनाथ वनमोरे आणि साईनाथ वनमोरे हे दोघे जनावरांना चारा आणण्यासाठी आज रविवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतात गेले होते. यावेळी शेतामध्ये उच्च प्रवाह असणारी विद्युत तार त्यांच्या शेतात तुटून पडली होती. या तारेचा परिसनाथ वनमोरे यांना धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांना विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच साईनाथ वनमोरे हा देखील त्यांना वाचविण्यासाठी गेला. परंतु त्याला देखील विजेचा धक्का बसल्याने तो देखील जागीच मरण पावला. वडील आणि लहान भाऊ बराच वेळ घरी न आल्याचे परिसनाथ यांचा मोठा मुलगा हेमंत वनमोरे हा त्या ठिकाणी आला. दोघांना विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याचे हेमंत हा चुलत चुलत्यांना बोलवण्यासाठी घरी गेला. यावेळी हेमंत आणि प्रदीप वनमोरे हे दोघे घटनास्थळी पोहोचले. परंतु पाण्यात पडलेल्या 440 व्होल्टच्या वायरचा जोरदार धक्का बसल्याने प्रदीप वनमोरे यांचा देखील जागीच मृत्यू झाला. तर याच पाण्यात पाय पडल्याने हेमंत हा देखील गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान घरातील या तिघांचा मृतदेह पाहून परिसनाथ यांच्या वडिलांना देखील हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.