कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या समन्वयासाठी पोलिस प्रशासन, महापालिका व नियुक्त कर्मचा-यांचे प्रशिक्षण
schedule22 Dec 25 person by visibility 79 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने आज महापालिका, पोलिस प्रशासन व निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे संयुक्त प्रशिक्षण व आढावा बैठक पार पडली.
ही बैठक राजाराम कॉलेज येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात महापालिका प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा पोलिस प्रमुख योगेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, भरारी पथक (FST), स्थिर पथक (SST) तसेच व्हिडीओ पडताळणी पथक (VST) यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून महापालिकेच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या सात निवडणूक कार्यालयाची माहिती, त्यांचे प्रमुख, कर्तव्ये, मतदार यादी व निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा सादर केला. तसेच नियुक्त कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या.
पोलिस उपअधिक्षक प्रिया पाटील यांनी पोलिस प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी पूर्णपणे सज्ज असून आवश्यक तेवढा पोलिस बंदोबस्त पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले. महापालिका हद्द व पोलिस स्टेशन हद्द यामध्ये योग्य समन्वय ठेवण्यात येईल. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच मतदान केंद्रे व स्ट्रॉंगरूम परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पोलिस प्रमुख योगेश शर्मा यांनी महापालिकेची निवडणूक प्रभागनिहाय होत असून यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढलेली असल्याचे नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वादाचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता असल्याने सर्व पथकांनी दक्ष राहून कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी महापालिकेने निवडणुकीसाठी आवश्यक माहिती व्यवस्थित तयार केली असून राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज सुरू असल्याचे सांगितले. मंगळवारपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होणार असून शेवटच्या दोन दिवसांत मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
उप-आयुक्त परितोष कंकाळ यांनी निवडणूक आचार संहितेकामी नियुक्त कर्मचा-यांनी पार पाडावयाच्या सर्व कामाची तपशीलवार माहिती स्लाईड शो द्वारे दिली. यामध्ये भरारी पथक (FST), स्थिर पथक (SST) तसेच व्हिडीओ पडताळणी पथकाती (VST) कर्मचाऱ्यांनी काय काय काम करायचे याबाबत मार्गदर्शन केले.
मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ यांनी निवडणूक खर्चाबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना परिपुर्ण माहिती दिली. उमेदवारांच्याकडूनही खर्चाचा तपशील घेणे व त्याबाबत जरुर ती कार्यवाही मुदतीत कराव्यात. निवडणूक खर्चासाठी 9 लाख खर्चाची मर्यादा आहे. पेड न्यूज स्टार प्रचारकांवर होणारा खर्च व सोशल मिडीयाद्वारे होणारा खर्च या सर्व बाबींचा उमेदवारांच्या खर्चामध्ये समावेश असल्याचे सांगितले.
प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस प्रशासनातील अधिका-यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने सर्व पथकांनी सतर्क व जबाबदारीने काम करावे, तसेच कोणतीही अडचण आल्यास परस्पर समन्वय साधून ती सोडवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी केले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षीका स्नेहलता नरवणे, मुख्य लेखाधिकारी राजश्री पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी, पोलिस निरीक्षक व नियुक्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





