SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जीवन प्राधिकरणावर गुरुवारी घागर मोर्चा; १३ गावांचा पाण्यासाठी एल्गारआमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावप्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य : शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूरडीकेटीईच्या सिव्हील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरीस्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांची सदस्यांसह झूम प्रकल्पास भेटजनगणना 2027 अंतर्गत महानगरपालिकेमार्फत जनगणना प्रशिक्षण शिबिराचा दुसरा टप्पा पूर्णकोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहतीतील घरफोडीचा छडा; ३.४५ लाखांच्या दागिन्यांसह चोरटा जेरबंदमुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सामन्यावर लावला जात होता सट्टा; ३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्तपंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावर उपसाबंदीमतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून बोगस मतदानाचे मनसुबे उधळून लावा : आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

प्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य : शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर

schedule05 May 26 person by visibility 149 categoryशैक्षणिक

  कोल्हापूर : पर्यावरणाशी संबंधित कार्यरत संस्था, संघटनांनी समन्वय आणि सहकार्यातून एकत्रित काम केल्यास प्रभावी पर्यावरण संवर्धन शक्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात झालेल्या गोलमेज परिषदेत उमटला.

  शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग, विद्यापीठ विकास मंच आणि कोल्हापूर अर्थ वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यापीठात ही परिषद झाली.

  या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून ‘दै. सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनामध्ये जनजागृतीचे महत्त्वाचे साधन म्हणून प्रसारमाध्यमांची भूमिका अनन्यसाधारण असल्याचे सांगून ते म्हणाले, पर्यावरण संवर्धन ही आपल्या अस्तित्वाशी निगडित महत्त्वाची बाब आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांची झपाट्याने होणारी घट ही गंभीर संकटे आपल्यासमोर उभी आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे. प्रसारमाध्यमे या प्रश्नाकडे समाजाचे सातत्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. वृक्षारोपण, पाणीसंवर्धन आणि प्लास्टिकविरहित उपक्रम यांसारख्या कृतींमध्ये सहभागी होणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरण टिकले, तरच भावी पिढ्यांना सुरक्षित आणि समृद्ध जीवनाची हमी आपण देऊ शकू, अन्यथा नाही.

  अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या बाबींना विद्यापीठाने नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यामुळेच जलसंवर्धनाच्या माध्यमातून आज शिवाजी विद्यापीठ पूर्णपणे जलस्वयंपूर्ण झाले आहे. येथून पुढेही पर्यावरणीय संरक्षणासाठी  विद्यापीठ नेहमीच सकारात्मक प्रयत्न करत राहील, असेही त्यांनी सांगितले.

  गोलमेज परिषदेत विविध पर्यावरणीय मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः पाण्याचे प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षतोड, प्लास्टिक संकलन, बांधकामातील खर मातीच्या व्यवस्थापनाबाबतचे प्रश्न यांसारख्या विषयांवर सहभागी संस्था प्रतिनिधींनी विचार मांडले. पर्यावरणाचे प्रश्न सोडवताना पर्यावरणविषयक कायदेशीर बाबींचा योग्य अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. विशेषत: तसेच घनकचरा व्यवस्थापन कायदा, २०२६ समजून घेऊन सध्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. पर्यावरणीय प्रश्नांबाबत प्रशासनाकडून माहिती मिळविण्यासाठी माहितीचा अधिकार वापरण्यासही हरकत नसल्याचे सांगण्यात आले. पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता या निमित्ताने अधोरेखित झाली. विद्यापीठाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून प्रभावी कृती आराखडा तयार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.  या परिषदेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यावरण चळवळीला नवी दिशा मिळेल आणि विविध संस्थांमध्ये समन्वय वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

  परिषदेत जिल्ह्यातील वृक्षप्रेमी वेल्फेअर, निरोगी व पर्यावरणपूरक प्रतिष्ठान, निसर्ग अंकुर, गार्डन्स क्लब,  वसुंधरा निसर्ग संरक्षण संस्था, सजग नागरिक मंच, कल्पवृक्ष अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, सायकल वेडे  कोल्हापूर आदी १६ स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

  पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी  जाधव यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली. कार्यक्रमास पर्यावरण शास्त्र विभागातील डॉ. सोनल चोंडे, डॉ. पल्लवी भोसले  यांच्यासह संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्या तृप्ती देशपांडे यांनी आभार मानले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes