दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा : प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर
schedule23 Jan 25 person by visibility 313 categoryराज्य

कोल्हापूर : युवकांनी, ग्रामस्थांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा तसेच वाहतुक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले. रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर व नेहरु युवा केंद्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी, ता. करवीर येथे रस्ते सुरक्षेविषयी जनमानसात प्रबोधन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत असणाऱ्या नेहरु युवा केंद्रामार्फत या आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित नागरिकांना रस्ते सुरक्षेविषयी माहिती देवून अपघातांची कारणे, परिणाम, अपघात रोखण्यासाठी उपाययोजना याविषयी सखोल माहिती देण्यात आली. कार्यक्रमास सायबर कॉलेजचे विद्यार्थी तसेच गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी राधानगरी-कोल्हापूर मार्गावर पोस्टरव्दारे जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वाहतुकीचे नियम पालन करणाऱ्यांचा प्रोत्साहनपर बक्षीसे, पुष्पगुच्छ, चॉकलेट देवून सन्मान करण्यात आला असून यासाठी नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास नेहरू युवा केंद्राचे गणेश भोसले व निलेश कांबळे, सायबर कॉलेजच्या डीन सोनिया राजपूत, भूषण पाटील, क्षितीजा उबाळे व नागरिक उपस्थित होते.