महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्मा
schedule11 Jul 26 person by visibility 78 categoryराज्य
मुंबई : येथे नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महिला स्वयंसहायता गटांच्या (SHG) कार्याचे कौतुक केले. 'फॉर्च्युन इंडिया' मासिकातर्फे आयोजित '१०० मोस्ट पॉवरफुल वुमेन' पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. महिला स्वयंसहायता गटांमुळे ग्रामीण आणि आदिवासी महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली असून, यामुळे त्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडले आहेत, असे राज्यपालांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, स्मृती इराणी, झिया मोदी आणि नीरजा बिर्ला यांच्यासह अनेक दिग्गज महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या हस्ते 'फॉर्च्युन इंडिया' मासिकाच्या नव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
राज्यपालांनी त्रिपुरा येथील एका ग्रामीण महिलेचे उदाहरण देताना सांगितले की, एकेकाळी बँकेत जाण्यास घाबरणारी ही महिला आज 'बँक सखी' म्हणून इतरांना मार्गदर्शन करत आहे.
महिलांकडील अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) १ टक्क्यापेक्षाही कमी असल्याने, महिलांकडे असलेला पैसा सुरक्षित असतो, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, महिला आता विकास प्रक्रियेत केवळ सहभागी नसून परिवर्तनाच्या अग्रस्थानी आहेत. केंद्र शासनाच्या 'नारीशक्ती वंदन' अधिनियम, 'पोषण अभियान' आणि 'आयुष्मान भारत' सारख्या योजनांचा फायदा महिलांना होत आहे. विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी समाजातील शेवटच्या स्तरावरील महिलेचे सक्षमीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट करण्यात आले.