राष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरच्या 'केआयटी'चा डंका; आयएसटीईचे दोन मानाचे पुरस्कार पटकावले
schedule14 Nov 26 person by visibility 165 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : गुणवत्ता, संशोधन आणि उद्योग क्षेत्राशी असलेल्या भक्कम समन्वयाच्या जोरावर येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाने राष्ट्रीय पातळीवर दुहेरी मुसंडी मारली आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) तर्फे दिला जाणारा यंदाचा अत्यंत प्रतिष्ठेचा 'बेस्ट इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन' पुरस्कार केआयटी महाविद्यालयाला जाहीर झाला आहे. तर, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. उदय भापकर यांना 'बेस्ट इनोव्हेटिव्ह रिसर्च वर्क' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
एक्झावेअर, अदानी, टेक महिंद्रा, टाटा पॉवर आणि कॉग्निझंट यांसारख्या ४५ हून अधिक दिग्गज राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या व संस्थांसोबत केआयटीचे सामंजस्य करार (MoU) आहेत. १००% मोफत प्लेसमेंट ट्रेनिंग, सेंटर ऑफ एक्सलन्स आणि थेट इंडस्ट्री इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांची प्लेसमेंट तब्बल दीडपटीने वाढली आहे.
महाविद्यालयाच्या या यशस्वी इंडस्ट्री-कनेक्टमुळेच त्यांना 'बेस्ट इंडस्ट्री इन्स्टिट्यूट' म्हणून गौरविण्यात आले. एका दिमाखदार सोहळ्यात टेक्नो इंडियाचे युनिवर्सिटीचे कुलगुरू डॉ. सैकत मित्रा यांच्या हस्ते केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी व ट्रेनिंग-प्लेसमेंट अधिष्ठाता डॉ. अमित सरकार यांनी महाविद्यालयाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
केआयटी मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. उदय भापकर यांनी वर्ष २०२५-२६ या एकाच वर्षात संशोधनात मोठी झेप घेतली आहे. त्यांच्या नावावर ७ आंतरराष्ट्रीय जर्नल पेपर्स, ३ पेटंट्स,आतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये विशेष मार्गदर्शन आणि २ बुक चॅप्टर्सची नोंद झाली आहे. त्यांच्या याच उत्कृष्ट योगदानाबद्दल कौन्सिल मेंबर श्रीमती नीता सूर्यवंशी यांच्या हस्ते डॉ.उदय भापकर यांना सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला आयएसटीईचे चेअरमन डॉ. प्रताप देसाई, टेक्नो इंडियाचे युनिवर्सिटीचे कुलगुरू डॉ. सैकत मित्रा, आयएसटीई महाराष्ट्र-गोवा चेअरमन डॉ. आर. के. सावंत, सेक्रेटरी प्रा. के. पी. कुंभार आणि कौन्सिल मेंबर श्रीमती नीता सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.या यशामागे संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले व अन्य विश्वस्त यांचे विशेष प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या सर्व पदाधिकारी, विश्वस्त, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उत्तुंग यशाबद्दल पुरस्कार प्राप्त विजेत्यांचे विशेष अभिनंदन केले.