गोकुळच्या निवडणुकीत पात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळावा
schedule13 Nov 26 person by visibility 49 categoryउद्योग
◼️महाराष्ट्र गोकुळ दूध उत्पादक संघटनेची मागणी; सहकार कायद्यात दुरुस्तीसाठी गावागावांत प्रबोधन करणार
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) आगामी निवडणुकीत वर्षभर नियमित दूध पुरवठा करणाऱ्या आणि भागभांडवल भरणाऱ्या पात्र उत्पादक शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्यात यावा, अशी ठाम मागणी महाराष्ट्र गोकुळ दूध उत्पादक संघटनेचे प्रवर्तक राजू एस. माने आणि नारायण पोवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टावर आणि नियमित दूध पुरवठ्यावरच गोकुळचा व्यवसाय व आर्थिक प्रगती अवलंबून आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी १८० दिवसांपेक्षा अधिक काळ प्राथमिक दूध संस्थांना दूध पुरवठा करतात आणि संस्थेचे भागभांडवलही भरतात. संघाच्या आर्थिक उलाढालीत त्यांचा मोठा वाटा असतो. मात्र, सध्याच्या सहकारी संस्था कायद्यानुसार प्राथमिक दूध संस्थेच्या केवळ एका सक्रिय प्रतिनिधीलाच मतदानाचा अधिकार मिळतो. यामुळे प्रत्यक्षात दूध घालणारे इतर सर्व पात्र शेतकरी मतदानापासून वंचित राहतात. हा प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणारा मोठा अन्याय असल्याची भावना माने व पोवार यांनी व्यक्त केली.
या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रत्येक सभासदाला थेट मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी सहकार कायद्यात योग्य ती दुरुस्ती होणे गरजेचे आहे. या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळावे, यासाठी आगामी काळात जिल्ह्यातील गावागावांत जाऊन प्राथमिक दूध संस्थांमधील सभासदांचे प्रबोधन केले जाणार असल्याचेही राजू माने यांनी यावेळी स्पष्ट केले.