दगड खाणीत उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेत असेल, तर शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत? आमदार सतेज पाटील यांची विचारणा
schedule09 Jul 25 person by visibility 137 categoryराज्य

कोल्हापूर : दगड खाणीत उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेत असेल तर शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली.
कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडीच्या हद्दीत डोंगररांगात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत उत्खनन केले जात आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हे उत्खनन नजरेस पडत नाही. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का?.
हातकणंगले तहसीलदारांच्या अहवालात ४ लाख ब्रास उत्खनन केले आणि दबावाखाली ९६ हजार ब्रास उत्खनन दाखवून १०० कोटींची राॅयल्टी भरली आहे असे दाखवले गेले आहे. आणि ज्यांनी दगड खाणीत उत्खनन केले त्यांनी मधल्या काळात हेलीकाॅप्टर घेतलं आहे. मोठी जाहिरात बाजी केली. दगड खाणीत उत्खनन करणारा हेलीकाॅप्टर घेत असेल तर शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत सभापती मोहदय असा सवाल ही आमदार पाटील यांनी केला आहे.
अनाधिकृत उत्खननाचे मोठं रॅकेट आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी जुनी राॅयल्टी वसुली झाली आहे का याची माहिती घेऊन मगच नवीन उत्खननाला परवानगी दिली पाहिजे. ४ लाख ब्रास उत्खननाच्या नोटीसा काढून २ वर्षे झाली तरी पैसे भरत नसतील आणि दुसऱ्या बाजूला हेच लोक हेलीकाॅप्टर खरेदी करत असतील तर महसूल विभाग नेमका काय करतो असा प्रश्न उपस्थित होत आहे.
टोप कासारवाडी हद्दीतील गट नंबर १४४ मध्ये अनाधिकृत राजरोसपणे दगड उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
अनाधिकृत उत्खनन करणाऱ्यां कडून राॅयल्टी वसुलीची कारवाई करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.
यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले राज्यात ज्या ज्या ठिकाणी अनाधिकृत उत्खनन केले असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तसेच दगडखाण आणि वाळू खाण चे ड्रोन सर्व्हेक्षण करणार आहे. हा ड्रोन जिपीएस द्वारे खाणींना जोडला जाणार आहे. तसेच आतापर्यंत खाणीत उत्खनन किती झाले, ज्यांनी खाणीत उत्खनन केले आहे त्यांनी राॅयल्टी किती भरली आहे आणि बाकी किती आहे याची चौकशी लावणार आहे. तसेच पुण्यात ड्रोन सर्व्हेक्षण सुरू केले आहे तसेच कोल्हापूर आणि संपूर्ण राज्यात सुरु करणार आहे. आणि ज्यांनी राॅयल्टी चुकवली असेल त्यांच्याकडून वसुली सुरू करु राॅयल्टी भरली नाही तर मालमत्ता वसुली करु असं ही बावनकुळे म्हणाले.