जोपर्यंत निर्णय होत नाहीत तोपर्यंत आमचं ठरलंय, हलायचं नाही : आमदार सतेज पाटील; विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना पाठिंबा
schedule09 Jul 25 person by visibility 244 categoryराज्य

कोल्हापूर : अशंत:विनाअनुदानित शाळांना जोपर्यंत जोपर्यंत वाढीव टप्प्याचा निधी मिळत नाही तोपर्यत आमचं ठरलंय, हलायचं नाही, या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या अशंत : विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे ताकदीनेे या शिक्षकांबरोबर आहोत. विनाअनुदानित शाळांना वाढीव टप्प्याचा निधी देण्याचा अध्यादेश ऑक्टोबरमध्ये झाला. पण अद्याप हा निधी दिला गेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर पाने पुसण्याचे काम या सगळ्या मंडळींनी केले. मार्चचे बजेट झाल्यानंतर याला चालना मिळेल, गती मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु पन्नास हजार कोटींच्या पुरवण्या झाल्या. साडेनऊ लाख कोटी कर्ज झाले. मग विनाअनुदानित शाळांना वाढीव टप्पा देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करायला तुमचे हात का बांधले आहेत. असा सवाल आमदार पाटील यांनी केला.
महाराष्ट्रामध्ये ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ गरज नसताना तुम्ही करता. मात्र, दुसऱ्या बाजूला आमच्या हक्काचे पैसे द्यायला मात्र सरकारची असते या शब्दांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा असून हा प्रश्न पुढे घेऊन जाण्याची भूमिका आम्ही घेऊ असा शब्द देत त्यांनी जोपर्यंत निर्णय होत नाहीत तोपर्यंत आमचं ठरलंय, हलायचं नाही. या शब्दांत आपली भूमिका जाहीर केली.