महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी : अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे
schedule09 Jul 25 person by visibility 130 categoryराज्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या कार्यालयासाठी कायमस्वरूपी पर्यायी जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी. पर्यायी जागा उपलब्ध नसल्यास सध्या असलेल्या जागेची देखभाल व दुरुस्ती करण्याचे निर्देश अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
अल्पसंख्याक विभागाअंतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी आमदार अमिन पटेल, रईस शेख, सना मलिक, महाराष्ट्र वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद, अध्यक्ष समीर काझी, उपसचिव मिलिंद शेणॉय, अवर सचिव विशाखा आढाव आदीसह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भरणे यांनी सांगितले की, मुंबई फोर्ट परिसरातील उर्दू साहित्य अकादमीची जागा ही अल्पसंख्याक विभागाच्या मालकीची असून, कार्यालयासाठी पर्यायी जागा शोधून अहवाल सादर करावा. तसेच, उर्दू आणि मराठी भाषांतील साहित्याचे सौंदर्य व साम्य अधोरेखित करण्यासाठी अधिकाधिक साहित्याचे भाषांतर या अकादमीमार्फत करण्यात यावे.
तसेच अकादमी मधील, मार्टि आणि आयुक्तालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रियाही गतीने राबवावी. वक्फ बोर्डाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. वक्फ बोर्डांतर्गत सुरू असलेल्या सुनावण्या आणि त्यांचे निकाल पोर्टलवर जनतेसाठी उपलब्ध करावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.