समस्येच्या मुळापर्यंत जाण्यास संशोधन उपयुक्त: कुलगुरु प्रा. शिर्के; माध्यम संशोधन कार्यशाळेचे उद्घाटन
schedule05 Feb 25 person by visibility 168 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : संशोधनातून वास्तवाचे दर्शन होते. कोणत्याही समस्येच्या मूळांपर्यंत जाण्यासाठी संशोधन उपयुक्त ठरत असते, असे मत कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित माध्यम संशोधन कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी इंडियन इन्टीट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या अमरावती कॅम्पसमधील मीडिया विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. विनोद निताळे, अहिल्यानगर येथील कम्युनिकेशन स्टडीजचे माजी विभागप्रमुख डॉ. बापू चंदनशिवे, मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.
कुलगुरु प्रा. शिर्के म्हणाले, कोणत्याही विषयाची सखोल माहिती मिळविण्यासाठी संशोधन आवश्यक असते. मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करावी लागते. माहितीचे वर्गीकरण, विश्लेषण आणि त्यानंतर तथ्यांची मांडणी करावी लागते. हे सर्व करण्यासाठी विविध सॉफ्टवेअरचा वापर करावा लागतो. संशोधकांनी अनेक स्त्रोतांद्वारे डेटा संकलित करुन त्याचे विश्लेषण आणि सादरीकरण करेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया संशोधनाचा एक भाग आहे. समस्यांची सोडवणूक करायची असेल तर चांगल्या प्रतीचे संशोधन होणे आवश्यक आहे.
केंद्र आणि राज्य सरकारे विविध प्रकारची माहिती संकलित करत असतात. ही माहिती सर्वांना उपलब्ध होण्यासाठी पोर्टलवर ठेवण्यात आली आहे. संशोधकांनी हा डेटा अभ्यासला तर त्यातून अनेक तथ्ये समोर येतील. असलेल्या व्यवस्थेत आणखी सकारात्मक सुधारणा करण्याची संधी यातून मिळेल, असेही प्रा. शिर्के म्हणाले.
स्वागत व प्रास्ताविक मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. जयप्रकाश पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. उद्देश पाटील याने सूत्रसंचालन केले. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.