५१ व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ
schedule09 Oct 25 person by visibility 132 category

कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू अमृत तिवले यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून ५१ व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांना उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. पोलीस परेड ग्राउंडवर पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधिकारी तानाजी सावंत, प्रिया पाटील, संतोष डोके तसेच विविध पोलीस स्थानक प्रमुखांची उपस्थिती लाभली.
आगामी तीन दिवस या स्पर्धा रंगणार असून ११ संघांमध्ये विभागलेल्या पावणे दोनशे खेळाडूंमध्ये विविध मैदानी खेळांचे सामने खेळले जाणार आहेत. या माध्यमातून पोलीस दलातील खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळणार असून स्पर्धात्मक वातावरणात संघभावना आणि शिस्तीचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळणार आहे.
या स्पर्धांना क्रीडा प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार यांनी उद्घाटनप्रसंगी केले. त्यांनी सांगितले की, "खेळातून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक सबळता आणि सहकार्याची भावना विकसित होते. पोलीस दलाने नेहमीच कर्तव्य बजावतानाच क्रीडाक्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे."
स्पर्धांच्या आयोजनासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सर्व सुविधा देण्यात आल्या असून मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पहिला मैदानी सामना रंगला आणि खेळाडूंनी दमदार खेळाची सुरुवात करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले .