चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न; १० लाखांची मागणी
schedule10 Oct 25 person by visibility 130 categoryगुन्हे

मुंबई : मोबाइलद्वारे अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला एका महिलेने त्यांच्याकडून याप्रकरणी दहा लाखाची मागणी केली याबाबत पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
ही अनोळखी महिला पाटील यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून फोन करत होती. संवाद वाढल्यावर काही तरुणींचे अश्लील फोटो पाठविले. पुढे त्यांच्याकडे तिने एकूण दहा लाखांची मागणी केली. काही दिवसांनंतर आमदार पाटील यांनी त्या महिलेचा त्रास वाढल्याने तिला ब्लॉक केले. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत अश्लील छायाचित्रे आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीन अशी धमकीही तिने दिली.
याबाबत पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात सायबर हनी ट्रॅपचा हा प्रकार दिसत असून याबाबत तपासून सुरू झाला आहे .