पाणी बिले वाटप विलंबाचा भुर्दंड नागरिकांवर नको; चुकीची पाणी बिले त्वरित दुरुस्त करा; 'आप'चे जल अभियंतांना निवेदन
schedule09 Oct 25 person by visibility 150 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरातील अनेक भागात गेले सहा महिन्यांपासून पाणी बिले वाटपास विलंब होत आहे. मीटर रीडरांची अपुरी संख्या, नादुरुस्त स्पॉट बिलिंग मशीन आणि काही रीडरांचा कामचुकारपणामुळे नागरिकांना वेळेत बिले मिळालेली नाहीत. दोन महिन्याचे बिलिंग सायकल असून देखील कर्मचाऱ्यांकडून बिले वितरित होत नसतील तर ही महापालिकेची चूक आहे. त्यामुळे रिडींग आणि वितरणात विलंब झालेल्या बिलावरील दंड व व्याज ग्राहकांना लावू नये अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.
राजारामपुरी, सम्राटनगर, उत्तरेश्वर पेठ परिसरातील पाणी बिले सहा-सहा महिने वितरित केली गेलेली नाहीत. पाणीपुरवठा विभागाच्या चुकीचा भुर्दंड नागरिकांना का असा सवाल शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केला. यावर जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी 55 नवीन मशीन मागवले आहेत, ते पुढील आठवड्यात येतील, तक्रारी आलेल्या मीटर रीडर यांना नोटीस काढल्या आहेत. दंड व्याजाची रक्कम त्यांच्याकडून वसुल करण्याची कारवाई प्रस्तावित आहे असे सांगितले. जिथं विलंब झाला आहे, तेथील नागरिकांचा दंड आणि व्याज दुरुस्त करू असे आश्वासन घाटगे यांनी शिष्टमंडळाला दिले.
दंड माफ करून बिले पूर्वरत केले नाहीत तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष सूरज सुर्वे, महासचिव अभिजित कांबळे, दुष्यंत माने, विजय हेगडे, संजय नलवडे आदी उपस्थित होते.