श्री जोतिबा डोंगरावर ‘दख्खन केदारण्य’ प्रकल्पांतर्गत वृक्ष पुनर्रोपणास सुरुवात; दोन हजार झाडांना मिळणार नवजीवन
schedule18 Dec 25 person by visibility 84 categoryराज्य
कोल्हापूर : श्री जोतिबा डोंगराचे प्राचीन आध्यात्मिक आणि नैसर्गिक वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाच्या वतीने ‘दख्खन केदारण्य’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथे पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात, राष्ट्रीय महामार्गाच्या कामात बाधित झालेल्या मोठ्या वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण करून या मोहिमेला गती देण्यात आली. या उपक्रमांतर्गत तब्बल दोन हजार मोठ्या वृक्षांना नवजीवन दिले जाणार असून, जोतिबाचा डोंगर पुन्हा एकदा घनदाट देवराईने नटणार आहे.
या मोहिमेचा शुभारंभ आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. कोरे म्हणाले की, जोतिबा डोंगराच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना केवळ भौतिक सुविधांवर भर न देता, पूर्वीच्या काळातील नैसर्गिक देवराई उभी करण्याचा आमचा मानस आहे. ‘केदार विजय’ या धार्मिक ग्रंथात जोतिबा डोंगरावरील ज्या वृक्षसंपदेचे वर्णन केले आहे, त्या सर्व देशी प्रजातींची झाडे येथे लावली जात आहेत. याचबरोबर विशेष म्हणजे, महामार्गांच्या कामात अडथळा ठरणारी २० वर्ष ते १०० वर्षांपूर्वीची मोठी झाडे तोडून नष्ट करण्याऐवजी, ती मुळासकट काढून या ठिकाणी पुनर्रोपित केली जात आहेत. हे पर्यावरणीय पुनर्जीवन ‘केदारण्य’ प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग असून, यासाठी पर्यावरण तज्ज्ञांसह चेन्नईमध्ये वृक्ष पुनर्रोपणाचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यातीलच तज्ज्ञ सुरेश जाधव यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभत आहे.
या कार्यक्रमास उपस्थित असलेले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासकीय नियोजनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, कागल आणि रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून काढलेल्या पहिल्या १० झाडांचे यशस्वी पुनर्रोपण आज करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने २०० झाडांचे तातडीने पुनर्रोपण केले जाईल आणि भविष्यात ही संख्या २,००० पर्यंत नेली जाणार आहे. ही झाडे केवळ लावली जाणार नाहीत, तर एजन्सीमार्फत ती जगवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समिती यावर प्रत्यक्ष लक्ष ठेवणार आहे. देवस्थानच्या मालकीच्या ३० एकर क्षेत्रात हा प्रकल्प साकारला जात आहे.
‘दख्खन केदारण्य’ या संकल्पनेतून साकारत असलेल्या या प्रकल्पामध्ये केवळ वृक्ष पुनर्रोपणच नव्हे, तर वृक्षसंगोपन आणि संवर्धनावरही भर दिला जात आहे. ५ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली होती. या उपक्रमात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढलेली मोठी झाडेही श्री जोतिबा चरणी अर्पण करणार आहेत.
या कार्यक्रमाला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प चंद्रकांत आयरेकर, गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांच्यासह अनेक अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे जोतिबा डोंगर परिसराचे नैसर्गिक सौंदर्य आणि पावित्र्य अधिक वृद्धिंगत होणार आहे.





