धनंजय महाडीक युवा शक्ती व भागीरथी महिला संस्थेकडून 200 क्षयरुग्ण दत्तक
schedule18 Sep 25 person by visibility 57 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडीक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागाकडील उपचाराखाली असलेले 200 गरजु क्षयरुग्णांना 6 महिने कालावधीकरीता दत्तक घेण्याचे जाहिर केले. या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नामदार आशिष शेलार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गरजू 25 क्षयरुग्णांना सकस आहार किटचे वाटप करुन करण्यात आले.
यावेळी भा.ज.पा.चे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, आरोग्याधिकारी उपस्थित होते.
खासदार धनंजय महाडीक यांनी प्रास्ताविकामध्ये भावना व्यक्त करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये या अभियानाचा एक भाग म्हणून क्षयरोग औषधोपचारा बरोबरच सकस आहाराचे महत्व अनन्य साधारण आहे. परंतु काही गरीब आणि गरजु रुग्णांना आर्थिक परिस्थितीमुळे सकस आहार घेता येत नाही. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन धनंजय महाडीक युवा शक्ती व भागीरथी महिला संस्थेच्यावतीने 200 क्षयरुग्ण 6 महिने कालावधी करीता दत्तक घेत आहोत असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे जेष्ट नेते नामदार आशिष शेलार यांनी बोलताना देशाचे पंतप्रधान हे प्रधान सेवक असल्याप्रमाणे काम करतात तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवुन कोल्हापूरमध्ये खासदार धनंजय महाडीक यांनी पंतप्रधान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन या समाजोपयोगी उपक्रमाची घोषणा करणे म्हणजे समाजातील गरजु लोकांपर्यंत पोहोचण्याची तळमळ दिसुन येते. असेच उपक्रम निरंतर सुरु ठेवावेत असे त्यांनी आवाहन केले.
शहर क्षयरोग अधिकारी डॉ. रुपाली यादव यांनी खासदार धनंजय महाडीक युवा शक्ती व भागीरथी महिला संस्थाचे महानगरपालिकेच्यावतीने आभार मानुन या पुढील काळात आरोग्य विभागच्या विविध उपक्रमांमध्ये मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.