सर्व उमेदवार निवडून आणून गुलाल लावूनच तुमच्यापाशी येऊ : ए वाय पाटील; राधानगरी तालुका काँग्रेसचा निर्धार
schedule22 Jan 26 person by visibility 143 categoryराजकीय
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील विखुरलेली काँग्रेस आता एकसंघ झाली असून येत्या सात तारखेला सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणून गुलाल लावूनच तुमच्यापाशी येऊ, असा ठाम विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी आणि करवीर तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या अजिंक्यतारा येथील मेळाव्यात ते बोलत होते.
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज अजिंक्यतारा कार्यालयात राधानगरी आणि करवीर तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी आणि उमेदवारांचा संयुक्त मेळावा पार पडला. या मेळाव्यात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि ज्येष्ठ नेते ए. वाय. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी स्वर्गीय पी. एन. पाटील यांनी काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली. काँग्रेस आजही जिवंत असून लोकांच्या मनात काँग्रेस आहे, मात्र कार्यकर्ते थेट लोकांपर्यंत पोहोचले तरच यश मिळेल, असे त्यांनी सांगितले. कोणीतरी लढायला हवं आणि कोणीतरी लोकांपर्यंत पोहोचायला हवं, तरच जनता काँग्रेसला साथ देईल, असेही ते म्हणाले. राधानगरी तालुका हा काँग्रेसच्या विचारांचा पाईक असून तो पुन्हा एकसंघ होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते ए. वाय. पाटील यांनी, कोल्हापूर जिल्हा आणि शहर नेहमीच काँग्रेसच्या विचारांसोबत ठामपणे उभे राहिले आहे असे सांगितले. आमदार सतेज पाटील यांनी एकहाती लढा देत कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला यश मिळवून दिलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला कोल्हापूर तुमच्या पाठीशी हिमालयासारखा उभा आहे, हे दाखवून दिले, असे त्यांनी सांगितले. चाळीस वर्षांनंतर राधानगरी तालुक्यातील काँग्रेस पूर्णपणे एकत्र आली असून, हातात हात घालून तालुक्याची घडी बसवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. जुन्या-नव्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला असून, या एकतेला कोणतीही दृष्ट लागू देणार नाही, असा ठाम विश्वास ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला. सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणून सात तारखेला गुलाल लावायला तुमच्यापाशी येऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.
माजी गोकुळचे संचालक पी. डी. धुंदरे यांनी, आयुष्यभर काँग्रेससोबत काम केल्याचे सांगत, परिस्थितीमुळे काही काळ वेगळ जावे लागले असले तरी बंटीसाहेबांच्या शिवाय आम्हाला पर्याय नाही. आज पुन्हा सर्वजण एकत्र आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षापासून ए वाय पाटील आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो. आता आम्ही तुमच्या माध्यमातून एकत्र आलोय. या एकजुटीचा फायदा या निवडणुकीत निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सदाशिव चरापले यांनी, काँग्रेसमधील घरवापसीबाबत आनंद व्यक्त केला. तसेच एकाकी लढा देत कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला यश मिळवून दिल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांचं अभिनंदन केले. तसेच आमदार सतेज पाटील यांचा सर्वांनी सत्कार केला.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यात काँग्रेसची एकजूट दिसून येत असून येत्या सात तारखेला होणाऱ्या निकालाकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.
मेळाव्यास आमदार जयंत आसंगावकर, माजी गोकुळ संचालक पी. डी. धुंदरे, तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तायशेटे, विश्वनाथ पाटील, ए. डी. चौगले, कृष्णा बापू पाटील, धीरज डोंगरे, सुभाष पाटील, दीपक पाटील, मानसिंग पाटील, बाजीराव चौगुले, मोहन धुंदरे, मोहन पाटील, रवींद्र पाटील, विलास हळदे, नंदुभाऊ पाटील, यांच्यासह राधानगरी आणि करवीर तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.