लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती मोहीम सुरु; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपास्थितीत घेतली शपथ
schedule27 Oct 25 person by visibility 62 categoryराज्य
कोल्हापूर : जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन. लाच घेणार व लाच देणार नाही. सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने करेन. जनहितासाठी कार्य करेन. व्यक्तीगत वागणुकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन. भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन, अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत 'दक्षता जनजागृती सप्ताहा' चा आज प्रारंभ करण्यात आला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबर भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. या सप्ताहानिमित्त राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी दिलेला संदेश यावेळी उपस्थितांना वाचून दाखवण्यात आला. भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने केंद्रीय सतकर्ता आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे.
यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील तसेच इतर विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन, लाचेची मागणी करणाऱ्यांची माहिती लाचलुचपत विभागाला द्यावी, असे आवाहन कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने याप्रसंगी करण्यात आले.