देशाचे नवे सरन्यायधीश ठरले.... न्यायमूर्ती सूर्यकांत यांची केंद्राकडे शिफारस
schedule27 Oct 25 person by visibility 88 categoryदेश
नवी दिल्ली : भारताचे विद्यमान सरन्यायाधीश (CJI) भूषण गवई यांनी आज न्यायमूर्ती सूर्यकांत यांची आपला उत्तराधिकारी म्हणून केंद्राकडे शिफारस केली. न्यायमूर्ती सूर्यकांत हे सध्या गवई यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई हे २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. केंद्राने अधिसूचना जारी केल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होतील.
पीटीआयच्या वृत्तानुसार, सरन्यायाधीश गवई यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली. २४ मे २०१९ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. सूर्यकांत यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली तर त्यांचा कार्यकाळ अंदाजे एक वर्षे दोन महिन्याचा असेल. कारण, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत हे मूळचे हिरयाणामधील हिसार येथील आहेत. सूर्यकांत यांनी १९८१ मध्ये हिसार येथील सरकारी महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केले. २००४ मध्ये त्यांना पंजाब आणि हरियाणा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. २०१८ मध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २४ मे २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आली.