मुख्य सचिव राजेशकुमार यांनी केली रामकाल पथसह विविध कामांची पाहणी
schedule08 Nov 25 person by visibility 53 categoryराज्य
नाशिक : राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी आज सायंकाळी रामकुंडसह विविध स्थळांना भेट देत पाहणी केली. तसेच याठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देण्याचे निर्देश दिले.
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव राजेशकुमार आज नाशिक येथे आले होते. दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी द्वारका परिसर, अमृत स्नान पर्वणी मार्ग, रामकुंड, काळाराम मंदिर, सीता गुंफा, स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.
यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार (विशेष), विभागीय आयुक्त तथा नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी रामकाल पथ, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष आदींसह महानगरपालिकेतर्फे कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.