प्रमुख प्रचारकांची संख्या आता २० ऐवजी ४०
schedule08 Nov 25 person by visibility 46 categoryराज्य
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने २० वरून ४० केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवून ४० करण्यात यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या कार्यालयात १४ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत केली होती.
‘महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, २०२५’ मधील परिच्छेद २६ मध्ये प्रमुख प्रचारकांसंदर्भातील तपशील नमूद केला आहे. त्यातील तरतुदींच्या आधारे आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही संख्या वाढविण्यात आली आहे. राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल.