धैर्यशील भोसलेची चेन्नई येथील ऑल इंडिया युनिव्हर्सिटी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
schedule06 Nov 25 person by visibility 56 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर क्रीडा परिषदेच्या सन 2025-26 या वर्षातील आंतरविभागीय जलतरण स्पर्धा शनिवार, दिनांक 01 नोव्हेंबर 2025 रोजी रयत शिक्षण संस्था, राजश्री छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर यांच्या विद्यमाने यशस्वीरीत्या संपन्न झाल्या. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रशालेचा विद्यार्थी धैर्यशील किरण भोसले याने 100 मी. व 200 मी. फ्री स्टाईल, 50 मी. व 100 मी. बटर फ्लाय तसेच 200 मीटर वैयक्तिक मिडले या प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई केली, तसेच 50 मी. फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदक मिळवले. अशा प्रकारे धैर्यशीलने एकूण पाच सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावत “सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटू” हा किताब मिळवला.
याआधी दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेतही धैर्यशीलने सर्वोत्कृष्ट जलतरणपटूचा बहुमान पटकावला होता. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे धैर्यशील भोसलेची चेन्नई येथे होणाऱ्या “ऑल इंडिया युनिव्हर्सिटी राष्ट्रीय स्पर्धा” (18 ते 23 डिसेंबर 2025) या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शिवाजी विद्यापीठाचे माननीय प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव व कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे त्याला प्रोत्साहन लाभले. तसेच प्रशालेचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. ए. बी. कोळेकर, क्रीडा समन्वयक प्रा. प्रविण सावंत यांनी धैर्यशीलचे अभिनंदन केले. धैर्यशीलला प्रशिक्षक प्रभाकर डांगे यांचे मार्गदर्शन लाभले.