आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करत निष्पक्ष, पारदर्शक वातावरणात प्रक्रिया राबवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule06 Nov 25 person by visibility 63 categoryराज्य
▪️नगरपंचायत/नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना बैठकीतून सूचना
कोल्हापूर : आदर्श आचारसंहितेतील २४, ४८ आणि ७२ तासांतील कार्यवाही पूर्ण करून सर्व सूचनांची योग्य अंमलबजावणी करा. सर्व निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्य प्रणालीद्वारे त्यांनी जिल्ह्यातील १० नगरपरिषदा व ३ नगरपंचायतींचे निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी असलेल्या तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या. बैठकीस जिल्हा सह आयुक्त, नगर प्रशासन नागेंद्र मुतकेकर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, विधानसभा व लोकसभेप्रमाणेच याहीवेळी सर्व प्रकारच्या कामकाजाची वाटणी विविध समित्यांद्वारे करावी. आचारसंहिता, मतदारयादी, मतदान केंद्र, मतदान प्रक्रियेतील साहित्य, मनुष्यबळ अशा विविध कामकाजासाठी गतीने प्रक्रिया राबवा. नामनिर्देशन स्वीकारताना चुका टाळा, सर्व नोंदी अचूक ऑनलाइन करा आणि छाननी प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडा. निवडणूक आयोगाने दिलेल्या निवडणूक अधिकारी मार्गदर्शक सूचनांचा चांगला अभ्यास करून नियमांचे तंतोतंत पालन करावे. निवडणूक प्रक्रियेतील सर्व कालावधी व वेळा पाळाव्यात. प्रशिक्षण प्रक्रियाही गतीने आणि योग्य गुणवत्ता राखून राबवा. अशा सूचना त्यांनी केल्या.
मतदान केंद्रांवरही योग्य व किमान आवश्यक सुविधांबाबत तयारी करा, ईव्हीएमबाबतच्या तपासणी प्रक्रिया वेळेत घ्या. स्ट्रॉंग रूमची सुरक्षा व्यवस्था योग्य असल्याची खात्री करा. मतमोजणीसाठी जागा निश्चित करून आवश्यक तयारी पूर्ण करा. येत्या एका महिन्याच्या निवडणूक कालावधीत जबाबदारीने पारदर्शक प्रक्रिया राबवून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या.
कोल्हापूर जिल्ह्यात १० नगरपरिषदांचा समावेश आहे. यात गडहिंग्लज, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगुड, पन्हाळा, शिरोळ, वडगाव यांचा समावेश आहे. तर ३ नगरपंचायतींमध्ये आजरा, चंदगड, हातकणगले यांचा समावेश आहे. उमेदवार नामनिर्देशन त्या त्या ठिकाणी १० नोव्हेंबरपासून १७ नोव्हेंबर (दुपारी ३.०० वाजेपर्यंत) रविवार वगळून दाखल करू शकतात. अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल. नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम कालावधी १९ ते २१ नोव्हेंबर दुपारी ३.०० वाजेपर्यंत आहे. मतदानाचा दिनांक २ डिसेंबर असून, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येईल. मतमोजणी दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबर रोजी होईल.