कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार व गतीने करा : प्रशासक के. मंजूलक्ष्मी
schedule10 Nov 25 person by visibility 47 categoryमहानगरपालिका
▪️उपशहर अभियंत्यांकडून विभागीय कार्यालयांतील रस्त्यांच्या कामांचा आढावा
कोल्हापूर : शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आज शहर अभियंता आणि सर्व उपशहर अभियंत्यांना दिल्या. आयुक्त कार्यालयातील सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीत शहरातील रस्त्यांची सद्यस्थिती, सुरू असलेली पॅचवर्कची कामे आणि त्यांच्या गुणवत्तेबाबतआढावा घेण्यात आला.
यामध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहरातील चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत सुरु असणाऱ्या पॅचवर्कच्या कामाची माहिती घेतली. शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागीय कार्यालयास 50 लाख रुपये याप्रमाणे रक्कम रुपये 2 कोटी निधी यापुर्वी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. हा निधी उपलब्ध करुन देऊनही रस्त्यांची कामे दर्जेदार व जलद गतीने केली नसलेने उप-शहर अभियंता यांची एक वेतनवाढ थोपविण्यात आली आहे. त्यामुळे सदरची कामे दर्जेदार करण्याच्या सूचना सर्व- उपशहर अभियंता यांना यावेळी देण्यात आल्या.
पावसामुळे शहरातील काही रस्ते मुरुमाने पॅचवर्क केली आहेत. त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले असून नागरीकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता प्रशासकांनी रस्त्यांची कामे दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. यामध्ये शहरातील जास्त गर्दीच्या ठिकाणी प्राधान्याने पॅचवर्क करा. मुख्य रस्त्यांचे दुरुस्तीचे आणखीन अंदाजपत्रक तयार करुन ते सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच परिख पुलाच्या कामाबाबत संबंधीत ठेकेदाराकडून विहित वेळेत काम पूर्ण करुन घेण्याच्या सूचना उपशहर अभियंता यांना दिल्या. शहरातील रस्त्याच्या कामासाठी सिल्कोटची कामे गतीने करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
महानगरपालिकेमार्फत पॅचवर्कसाठी प्लॅन्ट भाड्याने घेण्याची प्रक्रिया सुरु असून गुरुवारी सदरची निविदा उघडण्यात येणार आहे. हा प्लॅन्ड सुरु करुन चारही विभागीय कार्यालयामार्फत शहरातील रस्यां्तच्या पॅचवर्कसाठी आणखीन 2 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्यामुळे हा प्लॅन्ट तात्काळ महापालिकेमार्फत कार्यान्वीत करण्यासाठी पवडी विभागातील डांबरी प्लॅन्टवरील कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना प्रशासकांनी दिले.
या बैठकीला मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत व सहायक अभियंता सुरेश पाटील उपस्थित होते.