६ महिन्यांचे थकित मानधन देण्यासाठी पाठपुरावा करणार्या खासदार धनंजय महाडिक यांच्याप्रतीे आशा सेविकांकडून कृतज्ञता व्यक्त
schedule12 Jul 25 person by visibility 142 categoryसामाजिक

▪️ आशा सेविकांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याची मागणी
कोल्हापूर : राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचार्यांचे ६ महिन्याचे मानधन थकित होते. याबाबत आशा सेविकांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यावर केंद्रीय आणि राज्याच्या मंत्र्यांशी संपर्क साधून, खासदार महाडिक यांनी थकित मानधन तातडीने देण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार आशा सेविकांना थकित मानधन मिळाले आहे. त्याबद्दल आशा सेविकांनी खासदार महाडिक यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. आशा सेविकांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे करावे, अशी मागणी सेविकांनी यावेळी केली.
शासकीय आरोग्य यंत्रणेला पाठबळ देत खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत आरोग्य सुविधा पोचवणार्या राज्यातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचे ६ महिन्यांचे मानधन थकित होते. ही बाब सेविकांनी कानावर घातल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा करत, मानधन मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्याबद्दल आज आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्यावतीने खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन आभार मानण्यात आले. दरम्यान शासनाने आशा सेविकांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे निश्चित केले आहे. तसेच निवृत्तीनंतर त्यांना कोणताही निधी मिळणार नाही, असे जाहीर केले आहे. हा निर्णय आशा सेविकांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे आशा सेविकांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे करावे, निवृत्तीनंतर त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी १० लाख रुपयांचा सन्मान निधी मिळावा, त्यांना आरोग्य विमा लागू करावा, अशा मागण्या आशा सेविकांनी केल्या आहेत.
या मागण्यांबाबत खासदार महाडिक यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी संघटनेच्या राज्याध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांंनी केली. त्यावर संघटनेच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार महाडिक यांनी दिले. यावेळी जिल्ह्यातील आशा सेविका आणि गट प्रवर्तक उपस्थित होते.