साप्ताहिक करवीर काशीच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचेकडून गौरव
schedule12 Jul 25 person by visibility 106 categoryसामाजिक

मुंबई : सर्व चांगल्या चळवळींचे निर्भीड मुखपत्र साप्ताहिक करवीर काशीच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी गौरव केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे,"साप्ताहिक 'करवीर काशी'च्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विशेषांक प्रकाशित होत असल्याचे समजून आनंद झाला. २५ वर्षांच्या निरंतर प्रवासासाठी 'टीम करवीर काशी'चे तसेच वाचक व वितरकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो !
मराठी नियतकालिके, वृत्तपत्रे समाजाचा आवाज असून ती जनतेसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायक माध्यम राहिली आहेत. मराठी भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जोपासण्यातही नियतकालिकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही त्यांचे महत्त्व कायम आहे. साप्ताहिक 'करवीर काशी' यापुढेही निरंतर समाजप्रबोधन व माहितीच्या प्रसारासाठी आपले योगदान देत राहील या आशेसह, पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!"
'करवीर काशी' साप्ताहिकाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त संपादक, पत्रकार, वाचक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की,"पत्रकारिता ही समाजाच्या आरशासारखी असते. जनतेचे प्रश्न मांडणे, प्रशासन व समाज यांच्यात पूल बांधणे आणि सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देणे हे पत्रकारितेचे खरे कार्य असते. 'करवीर काशी' साप्ताहिकाने गेल्या काही वर्षांमध्ये या जबाबदारीची उत्तमरीत्या पूर्तता केली आहे. सत्य आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या भावनांना आवाज देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या साप्ताहिकाने सातत्याने केले आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने, 'करवीर काशी' च्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा! हे साप्ताहिक अधिक प्रभावीपणे कार्य करून समाजाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देत राहो, हीच सदिच्छा!"
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की,
"कोल्हापूर परिसरातील घडामोडी, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विषयांचा सातत्याने आलेख मांडत साप्ताहिक 'करवीर काशी'ने गेली अडीच दशके वाचकांची विश्वासार्हता जपली आहे. करवीर नगरीच्या वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या साप्ताहिक 'करवीर काशी'च्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करवीर नगरीतून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक 'करवीर काशी'ने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या रुपाने समाजाला जागरुक करणारे पत्रकारितेचे मौलिक कार्य केले आहे. निर्भीड पत्रकारितेसाठी आपली बांधिलकी ही नेहमीच आदर्शवत राहिली आहे.
वर्धापन दिनानिमित्त आपण या अडीच दशकांच्या प्रवासाचा आलेख उलगडून नव्या युगातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी सुरु करत आहात, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. येणाऱ्या काळातही 'करवीर काशी' हे साप्ताहिक निष्पक्ष, वस्तुनिष्ठ आणि प्रामाणिक पत्रकारितेचे प्रतीक ठरेल, असा माझा विश्वास आहे.
साप्ताहिक 'करवीर काशी'च्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त साप्ताहिकाच्या संपादकीय मंडळासह वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा !"