पावनखिंड तरुणांना ऊर्जा देणारी शिवमोहीम : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule12 Jul 25 person by visibility 152 categoryसामाजिक

▪️पुढील वर्षी सुसज्ज विश्रामगृह उपलब्ध करून देण्याची ग्वाही
पन्हाळा : पन्हाळगड ते पावनखिंड ही तमाम तरुणांना ऊर्जा देणारी शिवमोहीम आहे. या मोहिमेतील शिवभक्तांसाठी पुढील वर्षी सुसज्ज विश्रामगृह उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्राच्या वतीने पावनखिंड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पन्हाळगडावर खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते बाजीप्रभू देशपांडे पुतळ्याचे पूजन झाले.
दरम्यान प्रकाश आबिटकर यांनी मसाई पठार येथे पदभ्रमंतीमध्ये सहभाग घेतला.
श्री आबिटकर म्हणाले, युनोस्कोच्या माध्यमातून पन्हाळगडाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे, ही महत्वपूर्ण घटना असून किल्ले संवर्धन होणार आहे. पन्हाळगडाला खूप मोठा इतिहास आहे. भूगोलात जाऊन इतिहास समजून घ्यायचा असेल तर पन्हाळगड पावनखिंड मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. छत्रपती शिवरायांचा पराक्रमी इतिहास अशा मोहिमांच्या माध्यमातून समजून घेता येतो.
तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने यांनी शिवभक्तांना विश्रामगृह बांधून देण्यासाठी 14 कोटी निधी दिला आहे. सुसज्ज विश्रामगृहासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही आबिटकर यांनी दिली.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, युनेस्कोच्या यादीमध्ये पन्हाळगडाचा समावेश होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केला आणि त्याला यश आले. त्यामुळे आता गडकोटांचे संवर्धन अधिक चांगले होईल. गडकोटांसाठी वेगळे मंत्रालय सुरू करण्याबाबत ही पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवचरित्र अभ्यासक दीपकराव करपे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी मोहिमे बाबत भूमिका मांडली. मोहिमेत तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे सहभागी झाले होते.
यावेळी युवराज काकडे,, मोहीम प्रमुख ऋतुराज चौगुले, विजय सोळंके, भूपाल शेळके, संतोष शेळके, अश्विन वागळे, राजेंद्र पोवार, मोहन खोत, विनायक जाधव, निलेश पाटील, गणेश कदम, विजय खोत, महादेव सावंत यांच्यासह तमाम शिवभक्त सहभागी झाले होते.