इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच टेरिटोरियल आर्मीमधून पास आऊट होणारी पहिली महिला लेफ्टनंट सई जाधव यांचा संजय घोडावत शैक्षणिक संकुलात सन्मानपूर्वक गौरव
schedule23 Dec 25 person by visibility 50 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची कन्या व जयसिंगपूर येथील रहिवासी लेफ्टनंट सई जाधव यांनी टेरिटोरियल आर्मीमध्ये (प्रादेशिक सेना) नियुक्त होताना 'आयएमए' मधून पास होणाऱ्या पहिल्या महिला लेफ्टनंट बनण्याचा मान मिळवून इतिहास घडवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी यशाबद्दल संजय घोडावत एज्युकेशन कॅम्पसच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संजय घोडावत एज्युकेशन कॅम्पसचे चेअरमन संजय घोडावत यांनी लेफ्टनंट सई जाधव यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “सई जाधव यांचे यश हे केवळ वैयक्तिक नसून कोल्हापूर, महाराष्ट्र व देशातील तरुणींसाठी प्रेरणादायी आहे. देशसेवा, महिला सक्षमीकरण आणि युवकांना प्रेरणा देणारा आदर्श त्यांच्या वाटचालीतून निर्माण झाला आहे.”
सत्काराला उत्तर देताना लेफ्टनंट सई जाधव म्हणाल्या, “संजय घोडावत शैक्षणिक संकुलाने दिलेल्या सन्मानाबद्दल मी मनापासून आभारी आहे. माझे गाव आणि संजय घोडावत यांचे गाव एकच जयसिंगपूर असून, माझ्याच गावात असा भव्य सत्कार होत आहे, याचा मला विशेष अभिमान आहे. आज येथे उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींपैकी एक जरी मुलगी आर्मीमध्ये अधिकारी झाली, तर माझा हा सत्कार खऱ्या अर्थाने सफल झाला असे मी समजेन.”
"लेफ्टनंट सई जाधव" यांनी केवळ २३ व्या वर्षी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीची ('आयएमए') कठोर सैनिकी प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण करून ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच टेरिटोरियल आर्मीमधून महिला अधिकारी म्हणून पास आऊट होत लेफ्टनंट म्हणून कमिशन मिळवले आहे.
या दरम्यान, संजय घोडावत फाउंडेशन समाजसेवेच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना मदत व आरोग्यविषयक उपक्रम, पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना सहाय्य, कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत तसेच कोरोना काळात गरजू नागरिकांसाठी विविध मदतकार्य, नवीन सैन्य मोहिमेत देशभरातून आलेल्या युवकांसाठी अन्नछत्राचे आयोजन अशा अनेक सामाजिक उपक्रमांची परंपरा संजय घोडावत फाउंडेशनने जपली आहे.
या गौरव सोहळ्यास चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सुस्मिता मोहंती, विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे, लेफ्टनंट सई जाधव यांचे वडील मेजर संदीप जाधव, डॉ. सीमा नेगी, इंटरनॅशनल स्कूलचा संपूर्ण स्टाफ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





