माजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule16 Nov 25 person by visibility 62 categoryराज्य
▪️हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले दिवगंत वसंतराव नाईक यांनी राज्याच्या दुष्काळमुक्तीसाठी केलेली जलसंधारणाची कामे तसेच अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्णतेसाठी राबविलेल्या उपक्रमांचा आजही राज्याला मोठा लाभ होत आहे. राज्याला दिशा देणारे आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको येथे हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण, दुगधविकास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, आमदार अनुराधा चव्हाण, मनपा आयुक्त जी. श्रीकांत उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा राज्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे. राजकारणात विविध पदावर काम करताना महाराष्ट्र स्वयंपूर्ण करण्याचे देखील काम केले. बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली. समाजाला शिक्षणाकडे वळविण्यासाठी अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली असून समाजातल्या विविध परंपरा जोपासल्या पाहिजेत यासाठीही त्यांनी प्रयत्न केला, राजकीय सामाजिक जीवनामध्ये नगराध्यक्ष पदापासून आमदार, खासदार, मुख्यमंत्री अशा विविध पदांवर नाईक साहेबांनी काम केले. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणून दिवंगत नाईक साहेबांच्या नावाची नोंद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून आज दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण होत आहे, हा दिवस खऱ्या अर्थाने बंजारा समाजासह आपल्या सर्वांसाठी दिवाळीप्रमाणेच आहे. महानगर वेगाने वाढत असून महानगर सुंदर झाले पाहीजे, कुंभमेळयासाठी येणारे भाविक छत्रपती संभाजीनगर येथे येतील, त्यादृष्टीने शहराच्या रस्ते तसेच सर्वांगिण विकासासाठी निधीची तरतूद गरजेची असल्याचे ते म्हणाले. दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुतळा आपल्या सर्वांना प्रेरणा देईल, असेही ते म्हणाले. महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.