प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची राष्ट्रभक्तीपर समूहगान स्पर्धेत हॅटट्रिक!
schedule27 Aug 26 person by visibility 231 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त समिधा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आंतरशालेय राष्ट्रभक्तीपर समूहगान स्पर्धा २०२६ मध्ये प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. प्रशालेने दोन्ही गटांत उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक पटकावत हॅटट्रिक साधली आहे.
▪️स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दाखवलेले यश खालीलप्रमाणे :
मोठा गट (प्रथम क्रमांक ): विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर आणि जोशपूर्ण गायकीने उपस्थितांची मने जिंकली. प्रथम क्रमांकासह त्यांना रोख ५,००० रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.
लहान गट (उत्तेजनार्थ पारितोषिक ): लहान गटातील बालिकांनीही अत्यंत आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करत उत्तेजनार्थ पारितोषिक आणि रोख १,००० रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक पटकावले.
विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशामागे देशभक्ती, सांघिक भावना आणि कलेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. या यशाबद्दल सर्व सहभागी विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थिनींना हे यश मिळवून देण्यासाठी संगीत शिक्षिका प्रीती पोवार आणि संदेश खेडकर यांनी अतिशय मोलाचे संगीत प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. प्रशालेच्या या गौरवास्पद यशाबद्दल मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्वांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.