6 व 7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टी
schedule04 Feb 26 person by visibility 74 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 12 पंचायत समितीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून मतदान शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मतदान केंद्रावर मतदान कर्तव्य बजावण्यासाठी मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळेतील अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश आहे.
मतदान कर्तव्याकरिता नियुक्त मतदान पथकांना शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून संबंधित तालुका स्तरावरून निवडणूक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. साहित्य घेऊन मतदान पथकांनी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून पोहोचण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कार्यरत *सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची* जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे, त्या शाळांना शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तसेच ज्या शाळेतील (प्राथमिक व माध्यमिक) *सर्व शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती झालेली नाही*, त्या शाळा शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत भरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांच्या परिपत्रकानुसार शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याने निवडणूक मतदान होणाऱ्या क्षेत्रातील सर्व शाळांना शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिले.