कोल्हापूर : दारूच्या नशेत रोजचा मारहाण अन् छळ; शेवटी मुलानेच काढला बापाचा काटा!
schedule03 Jun 26 person by visibility 127 categoryगुन्हे
- वडिलांच्या हत्येनंतर मुलाचा पोलिसांनाच 'मिसिंग'चा बहाणा; अवघ्या २४ तासांत उकल
कोल्हापूर: कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक खुनाच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. रोजच्या जाचाला आणि दारूच्या व्यसनाला कंटाळून पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांचा क्रूर खून केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, वडिलांची हत्या केल्यानंतर मुलाने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ते 'बेपत्ता' असल्याची तक्रार दिली होती, मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांत या खुनाचा छडा लावला आहे.
२९ मे २०२६ रोजी फिरोज खानसो मुजावर (वय ४४) हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा रेहान याने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर २ जून रोजी शिरोलीतील एका विहिरीत एका बेवारस पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळला. शवविच्छेदन अहवालात फिरोज मुजावर यांच्या तोंडात कापड कोंबून आणि डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांची जुळवाजुळव केली असता, मयत फिरोज हे दररोज दारू पिऊन पत्नी आणि मुलांना मारहाण करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयित मुलगा रेहान फिरोज मुजावर (वय २०) याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने आपल्या पापाची कबुली दिली.
रेहानने पोलिसांना सांगितले की, वडिलांच्या त्रासाला कंटाळून त्याने आपला मित्र वीरपाशा सैंदुलाल जहाँगीरदार याच्या मदतीने हा कट रचला होता. २९ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास वडिलांना घराच्या मागील बाजूला नेऊन रेहानने स्वतःच्या चिकन दुकानातील 'सत्तुराने' (धारदार हत्यार) त्यांच्या डोक्यात जोरदार वार करून त्यांची हत्या केली. खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी मृतदेह मोटारसायकलवरून नेऊन विहिरीत फेकून दिला होता. त्यानंतर रेहानने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वडील बेपत्ता असल्याची खोटी तक्रार दिली होती.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सपोनि सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.