कोल्हापुरात वृद्धाला लुटणारी सराईत इराणी टोळी जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
schedule08 May 26 person by visibility 110 categoryगुन्हे
कोल्हापूर : मुरगुड येथील एका वृद्ध व्यक्तीची हातचलाखीने फसवणूक करून त्यांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. २७ एप्रिल २०२६ रोजी ७६ वर्षीय विश्वनाथ भिवाजी शिंदे हे मुरगुड येथील मुख्य बाजारपेठेतून जात असताना, दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना सोने चोरीला जात असल्याची भीती दाखवून त्यांचे दागिने काढून एका कागदात ठेवण्यास सांगितले. मात्र, आरोपींनी हातचलाखी करून दागिन्यांचे पाकीट बदलले आणि तिथून पोबारा केला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात करण्यात आली होती. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रसुल इराणी याने केल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस पथकाने कोल्हापूर-सांगली रोडवरील अतिग्रे गावाच्या हद्दीत सापळा लावून रसुल सरताज इराणी आणि सुमित संदीप दाईंगडे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याची लगड, अंगठी, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ३,१०,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुख्य आरोपी रसुल इराणी याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात मिळून जबरी चोरी आणि एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत १० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. अटकेनंतर आरोपींना पुढील तपासासाठी मुरगुड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.