कोल्हापूर : शिरोली जकात नाक्यातील जुना डिव्हायडर हटविण्याचे काम महापालिकेच्यावतीने सुरू
schedule18 Nov 25 person by visibility 87 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : शिरोली जकात नाका येथील आयआरबी कंपनीच्या टोल नाक्यामुळे होत असलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.4 (छत्रपती ताराराणी मार्केट) च्यावतीने टोल नाक्यातील जुना डिव्हायडर हटविण्याचे काम आज सुरू करण्यात आले आहे.
आयआरबी कंपनीने शिरोली नाका परिसरात उभारलेला शेड वजा टोल नाका आणि आतील रोड डिव्हायडर टोल बंद असूनही कायम असल्याने या मुख्य मार्गावरील वाढत्या वाहतुकीला यातून मोठा अडथळा निर्माण होत होता. डिव्हायडरमधून वाहनांची ये-जा करताना वारंवार गर्दी होऊन ट्रॅफिक जामच्या घटना वाढल्या होत्या. परिणामी या ठिकाणी लहान-मोठे अपघातही घडत होते.
या पार्श्वभूमीवर विभागीय कार्यालय क्र.4 तर्फे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मान्यतेने डिव्हायडर हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. डिव्हायडर ब्रेकरच्या सहाय्याने तोडण्यात येत असून यासाठी 1 ब्रेकर, 1 जेसीबी, 2 डंपर, 1 गॅस कटर व 20 कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे काम सुरू आहे.
टोल नाक्यावरील शेडही लवकरच हटवण्यात येणार असून त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. सदरची कारवाई सहा.आयुक्त कृष्णा पाटील, उपशहर अभियंता निवास पोवार, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल तसेच पॅनलवरील स्ट्रक्चरल इंजिनिअर प्रशांत हडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.