हिंदीमध्ये रोजगाराच्या अनेक संधी: अमरदीप कुलश्रेष्ठी; विद्यापीठात ‘हिंदी पखवाड़ा’ समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा
schedule08 Oct 25 person by visibility 141 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : हिंदी जगामध्ये बोलली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. या भाषेच्या माध्यमातून अनुवाद, राजभाषा अधिकारी यांसह विविध क्षेत्रांमध्ये अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी भाषेच्या विद्यार्थ्यांचे दोनपेक्षा अधिक भाषांवर प्रभुत्व असले पाहिजे, असे प्रतिपादन यूको बँकेचे पुणे येथील राजभाषा अधिकारी अमरदीप कुलश्रेष्ठी यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये सोमवारी ‘हिंदी पखवाडा’ समापन समारोह व त्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून आजरा महाविद्यालयाचे डॉ. अशोक बाचूळकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी अधिविभागप्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी होत्या.
डॉ. अशोक बाचुळकर म्हणाले की, भाषा मानवी समाजाला जोडते, मात्र जपून वापर न केल्यास ती तोडूही शकते. साहित्यिकांनी नवसंजीवनीची घुटी समाजाला दिली पाहिजे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष हिंदी विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी यूको बॅकेचे हिंदी भाषेच्या प्रसारातील योगदानाबद्दल कौतुक केले. हिंदीतील संधी सांगतानाच यशस्वी होण्यासाठी कष्टाला पर्याय नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी हिंदी विभाग व यूको बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदी पंधरवड्यानिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन, काव्य वाचन, शॉर्ट फिल्म मेकिंग, वाद-विवाद, निबंध लेखन व अनुवाद स्पर्धेतील विजेत्यांचा रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धांमध्ये महाविद्यालये व विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी यूको बँकेचे व्यवस्थापक क्रांतिकुमार देवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयसिंग कांबळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. गीता दोडमणी यांनी करून दिली. यावेळी, डॉ. सुवर्णा गावडे, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. सुषमा चौगले, प्रतीक्षा ठुंबरे, डॉ. अनिल मकर, डॉ. अक्षय भोसले, डॉ. प्रकाश मुंज तसेच संशोधक विद्यार्थी, एम. ए. हिंदी व भाषा प्रौद्योगिकी भाग १ व २ चे विद्यार्थी आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आराधना कदम व गुलामगौस तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रकाश निकम यांनी आभार मानले.