कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचे सभासद प्रशिक्षणासाठी रवाना
schedule30 Jun 25 person by visibility 241 categoryउद्योग

हुपरी : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या प्रामुख्याने ऊस शेती व साखर उत्पादनाशी संबंधीत संशोधन व मार्गदर्शन करणार्या नामवंत संस्थेच्या वतीने 1 ते 4 जुलै 2025 या कालावधीत आयोजित केलेल्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षण शिबीरासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे 32 ऊस उत्पादक सभासद शेतकरी रवाना झाले. या प्रशिक्षणार्थी सभासद शेतकर्यांना व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी मार्गदर्शन करून आधुनिक ऊस शेती प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देवून सर्वांना रवाना केले.
शेतकर्यांची ऊस शेती किफायतशीर होवून उत्पादनात वाढ व्हावी व त्यामधील सातत्य टिकवण्याच्या दृष्टीने कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने विविध ऊस विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. शेतीची सुधारीत पध्दत व शास्त्रोक्त तंत्रज्ञानाची सखोल माहिती कारखान्याच्या सभासद शेतकर्यांना व्हावी यासाठी कार्यक्षेत्रामध्ये वेळोवेळी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आणि कारखान्याच्या शेती तज्ञांकडून मार्गदर्शनासाठी परिसंवादाचे आयोजन केले जाते. या अंतर्गत हे सभासद ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षण शिबीरासाठी पाठविण्यात आले आहेत.
याप्रसंगी ज्येष्ठ संचालक आण्णासो गोटखिंडे संचालक सुरज बेडगे, प्रकाश पाटील, जनरल मॅनेजर (केन) किरण कांबळे, उपमुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे, सिनियर अॅग्री ओव्हरसियर अजित चौगुले, प्रशिक्षणार्थी सभासद व मुख्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.