सारथी उपकेंद्र कोल्हापूर अंतर्गत संशोधक विद्यार्थ्यांची एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात
schedule07 Oct 25 person by visibility 138 categoryसामाजिक

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेच्या माध्यमातून मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी या लक्षित गटातील होतकरु विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी अविरत प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने सारथी उपकेंद्र कोल्हापूरच्यावतीने संशोधक विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शाहू सभागृह, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे करण्यात आले.
सारथीच्या माध्यमातून सन 2019 पासून राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेतून आतापर्यंत पाच विद्यापीठांतील तब्बल 426 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ झाला आहे. संशोधन केवळ मर्यादित न राहता समाजाच्या जीवनमानात परिवर्तन घडवणारे ठरावे, अशी अपेक्षा सारथीच्या सह व्यवस्थापकीय संचालक श्रीमती किरण कुलकर्णी यांनी व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या ही सारथीच्या अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे म्हणाले, संशोधनाचा थेट उपयोग ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालये, शेतकरी गट व सामाजिक संस्थांशी संवाद साधत समाजकार्यासाठी व्हावा.
आशिष भुवड, दिग्विजय पाटील, अपूर्वा पाटील, मयुरेश पाटील आणि संदीप माने या पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधनावर आधारित सादरीकरण केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. डॉ. एस. डी. डेळेकर यांनी 'संशोधनाची उपयुक्तता व स्टार्टअप' या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विलास पाटील, कार्यकारी अधिकारी, सारथी पुणे यांनी तर नयन गुरव, संशोधन अधिकारी यांनी आभार मानले. या वेळी अनिस पटेल, सहा लेखाधिकारी, सारथी उपकेंद्र कोल्हापूर, विविध प्राध्यापक, तसेच सारथीचे पीएच.डी. संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.