"दुर्गम,आदिवासी, ग्रामीण आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची समुपदेशनाद्वारे, पारदर्शक पद्धतीने पदोन्नती करण्याचा आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय"
schedule20 Dec 25 person by visibility 59 categoryआरोग्य
मुंबई : राज्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात गट "ब" संवर्गात कार्यरत असलेल्या 190 वैद्यकीय अधिकाऱ्यांना गट "अ" संवर्गात रिक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
आरोग्य विभागाने अत्यंत पारदर्शीपणे, समुपदेशनाद्वारे, वैद्यकीय अधिकारी यांचे पसंती क्रमानुसार, राज्यातील 190 वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती कोठ्यातील रिक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामुळे वरिष्ठ पदावरील रिक्त जागा तात्काळ भरल्या जाणार असुन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर सर्व रुग्णालयातील कामकाज अधिक प्रभावी होण्यास मदत होईल. विशेषतः आदिवासी दुर्गम व ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होईल. या निर्णयामुळे दीर्घकाळ पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनोबल वाढले असुन, वैद्यकीय सेवेवरही त्याचे सकारात्मक परिणाम होतील अशी अपेक्षा आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-ब मध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी (वेतनस्तर एस-१६: ₹४४९००-१४२४००), यांना महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी (वेतनस्तर एस-२०: ₹५६१००-१७७५००), या संवर्गात स्वरूपात तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी झाला असून, शासन निर्णयातील अटी व शर्तींच्या अधीन राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांना नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी समुपदेशनाद्वारे पदोन्नती देण्याबाबत घेतलेल्या पारदर्शी व सकारात्मक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकारी संवर्गातून समाधान व्यक्त होत असुन, आरोग्य विभागातील एक महत्त्वाचा प्रशासकीय प्रश्न मार्गी लागला आहे. विशेषत: दुर्गम, आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जाते.
आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, उपसचिव दी. नी. केंद्रे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अवर सचिव वसंत गायकवाड, सहसंचालक राजेंद्र भालेराव, मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांचे मार्गदर्शनाखाली समुपदेशन प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली.





