शेंडा पार्क येथे 35 कोटींचे कृषी भवन, सतेज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
schedule09 Oct 25 person by visibility 177 categoryराज्य

कोल्हापूर : शेंडा पार्क, आर के नगर येथे आधुनिक कृषी भवन बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून 35.31 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला गुरुवारी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबत तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे व विद्यमान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र पाठवून कृषी भवन उभारण्याची मागणी केली होती. कृषी भवनसाठी मंजुरी मिळाल्याने आमदार पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
कृषी भवनच्या या इमारतीत प्रशासकीय कार्यालय, प्रयोगशाळा, वसतिगृह, गोदाम, कॅन्टीन, विक्री केंद्र आणि सुरक्षा रक्षक निवास अशा विविध सोयींचा समावेश असणार आहे. हे कृषी भवन कोल्हापूरमधील कृषी विभागाच्या कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार एकूण बांधकाम खर्च 35 कोटी 31 लाख 30 हजार रुपये इतका असेल. या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात (2025–26) ₹11 कोटी, दुसऱ्या टप्प्यात (2026–27) ₹12.50 कोटी आणि तिसऱ्या टप्प्यात (2027–28) 11.81 कोटी इतका खर्च करण्यात येईल. काम सुरू करण्यापूर्वी पर्यावरण विभाग, अग्निशमन विभाग तसेच स्थानिक प्राधिकरणांची आवश्यक मान्यता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इमारतीच्या आराखड्यासाठी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञांनी तांत्रिक संमती दिली आहे.
📌कोल्हापूर जिल्हा हा कृषी संपन्न आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी अत्याधुनिक कृषी भवन आवश्यक होते. यासाठी कृषी मंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने कोल्हापूर मध्ये कृषी भवन मंजूर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार, तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे व विद्यमान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार.
▪️आमदार सतेज पाटील, गटनेते विधानपरिषद काँग्रेस