+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustयुपीएससी परिक्षेत झळकले सारथीचे २० विद्यार्थी adjustलोकसभा निवडणूक 2024 : गुरुवारी कोल्हापूरसाठी 12 उमेदवारांनी 16 तर हातकणंगलेसाठी 14 उमेदवारांनी 17 नामनिर्देशनपत्रे केली दाखल adjustयशवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ उत्साहात adjustघरफाळा विभागाच्यावतीने 1 लाख 58 हजार 500 बिले जनरेट adjustभारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ adjustलोकसभा निवडणूक 2024 : माढ्यातील उमेदवाराची अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरुन एन्ट्री adjustघोडावत विद्यापीठातील कॉमर्स व मॅनॅजमेण्ट विभागाच्या ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustपरगावी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी 7 मे रोजी मतदानासाठी येण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी, अमोल येडगे यांचे आवाहन adjustदुग्ध व्यवसायामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : अरुण डोंगळे; कुशिरे येथे दूध उत्पादकांना जातिवंत म्हैशी प्रदान करण्याचा कार्यक्रम adjustआरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत
Photo_1712720584815~2
Photo_1711784304922~2
SMP_news_Gokul_ghee
schedule31 Mar 24 person by visibility 263 categoryसामाजिक
▪️रविवार दिनांक ३१ मार्च: संत एकनाथ षष्ठी निमित्त...

महाराष्ट्राची भूमी संतमहात्म्यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे.भागवत संप्रदायातील अठरापगड जातींचे संतांनी समतेचा, एकात्मतेचा, व शांतीचा संदेश दिला. थोर संतरत्न एकनाथ महाराज यांना शांतीब्रम्ह म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म पैठण येथे इ.स. १५३२ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण तर आईचे नाव रुक्मिणी. या सात्विक मातापित्यांच्या पोटी संत एकनाथांचा जन्म झाला आणि अल्पावधीतच या मातापित्यांचा अकाली देहांत झाला. पुढे त्यांचे पालनपोषण आजी आजोबांनी केले. भानुदासांच्या पवित्र कुळात अत्यंत सुसंस्कृत व भक्तीप्रधान वातावरणात एकनाथ महाराज लहानाचे मोठे झाले. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्मिक ओढ लागली होती.आत्यंतिक सरळपणा, नम्रता, क्षमा, दया, उदारपणा, जनतेप्रती ममत्व, व परोपकार या गुणांमुळे ते सर्वांना प्रिय होते. संस्कृत व मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. ईश्वरदर्शनाची तीव्र ओढ असल्याने त्यांनी ध्यानधारणा सुरू केली, ध्यानातूंनच त्यांना "तू जनार्दन स्वामींकडे जा" असा स्पष्ट आदेश त्यांच्या अंतर्मनाकडून मिळाला.

 एके दिवशी कुणालाही न सांगता जनार्दन स्वामींचा शोध घेण्यासाठी ते घराबाहेर पडले, जनार्दन स्वामींचा शोध घेत घेत ते थेट दौलताबादला येऊन पोहोचले. जनार्दन स्वामींचे दर्शन झाल्यावर ते मनोमन सुखावले. त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांना जनार्दन स्वामींनी प्रेमाने आलिंगन दिले.एकनाथ महाराजांची परमार्थाची ओढ व मोकळे अंतःकरण पाहून जनार्दन स्वामींना परमानंद झाला. प्रथम भेटीतच एकनाथ महाराज यांना जनार्दन स्वामी हेच आपले गुरू आहेत असे वाटू लागले, त्यामुळे ते जनार्दन स्वामींची सेवा करण्यातच धन्यता मानू लागले. काया-वाचा- मनाने ते गुरूमय झाले. सद्गुरू सेवेत ते आपले अस्तित्व विसरून गेले. जनार्दन स्वामींशी एकरुप झाले, सतत गुरुस्मरणातून भगवंताच्या प्रगाढ अनुसंधानात ते राहू लागले. ध्यानीमनी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या शिवाय अन्य विषयच त्यांच्या ठायी राहिले नाहीत.गुरुसेवा व गुरू कृपेने शांतीब्रम्ह एकनाथ महाराज ब्रम्हरूप बनले.

 एके दिवशी दौलताबाद किल्ल्यावर जनार्दन स्वामीं समाधीत निमग्न होते. एकनाथ महाराज त्यांच्या दारात रक्षक म्हणून राहिले होते , त्या वेळी गडावर एकदम आरडाओरडा झाला. शत्रु सैन्य गडावर चाल करून आले होते, एकनाथ महाराजांना हे समजताच सदगुरू जनार्दन स्वामींची समाधी भंग होऊ नये म्हणून जनार्दन स्वामींचा गणवेश घालून सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी शत्रूसैन्यावर चाल केली. ढालतलवार, भाला आदी शस्त्रांनी लढून शत्रूसैन्याला सळो की पळो करून सोडले. किल्ल्यावरील हल्ला परतवून लावला. जनार्दन स्वामींच्या समाधीचा भंग होऊ नये म्हणून परत येऊन रक्षक वेषात येऊन बसले. थोड्या वेळाने जनार्दन स्वामीं देहभानावर आले, सारा प्रकार लक्षात येताच जनार्दन स्वामींनी त्यांच्या पाठीवर थाप मारत शाबासकी दिली.

 एकनाथ महाराजांना कोणतेही काम मन लावून करण्याची सवय होती. एके दिवशी कचेरीच्या हिशेबात एका पैशाची चूक होऊ लागली. काही केल्या चूक सापडेना. दिवसभर गुरुची सेवा करुन जनार्दन स्वामीं झोपी गेल्यावर एकनाथ महाराज दिव्यात तेल घालून हिशोब करुन एका पैशाची चूक शोधत असता मध्यरात्र उलटून गेली. शेवटी एका पैशाची चूक सापडल्यावर आनंदाने नाचू लागले. जनार्दन स्वामींना जाग आली, त्यांनी विचारले, "एवढ्या रात्री आनंदाने नाचायचं कारण काय?", एकनाथ महाराजांनी सर्व हकीकत सांगितली, तेंव्हा जनार्दन स्वामीं म्हणाले," हिशेबातील एक पैशाची चूक सापडताच तुला इतका आनंद झाला, मग जीवनातील चूक सापडली तर तुला ब्रम्हानंद होईल...!". अशाप्रकारे सदगुरू सेवेने एकनाथांचे अंतःकरण निर्मळ बनले होते. देहबुद्धी क्षीण पावून एकनाथ अध्यात्म ज्ञानाचे अधिकारी बनले. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या दोन्ही ग्रंथातील आशय त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेला. अध्यात्मिक सर्व ग्रंथ वाचून सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सखोल अभ्यास केला. शब्द ज्ञानात ते पारंगत बनले. परमार्थाचे स्वानुभव घेऊन ते समृद्ध बनले. त्यांना अध्यात्मिक सिध्दी प्राप्त झाली. ईश्वराचे अनुसंधान परीपक्व बनले. आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार यांने त्यांचे जीवन उजळून निघाले. 

      एके दिवशी एकनाथ महाराज सहजसमाधीत प्रगाढ अवस्थेत गेले असता एक भला मोठा सर्प (भुजंग) त्यांच्यावर आपली फणा उभारून डोलत असतांना एका गुराख्याने पाहिले, तो अवाक् झाला. मनातून घाबरून त्यांने आरडाओरडा केला, एकनाथ समाधीतून भानावर आले. तो फणा उभारून राहिलेला भला मोठा भुजंग जाताना पाहिला.त्यानंतर जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना सगुण रूपात दत्त प्रभूंचे दर्शन देऊन त्यांच्या अध्यात्मिक जीवनात अमुलाग्र क्रांती घडवून आणली. अध्यात्मिक सिध्दी प्राप्त झाल्यानंतर त्यांना विदेही अवस्था प्राप्त झाली. तेंव्हा एकनाथांना त्यांनी भारतभर तीर्थयात्रा करण्याची आज्ञा केली. स्वतः जनार्दन स्वामीं एकनाथ महाराजांबरोबर तीर्थयात्रा करण्यास निघाले. हा अपूर्व असा योग होता. गुरुशिष्य रात्री जेथे विश्रांती घेत, तेथे जनार्दन स्वामीं निरूपण करत. एका रात्री चांडवड गावात एका ब्राह्मणाच्या घरी गुरू शिष्याने वास्तव्य केले. चतुःश्लोकी भागवतावर मराठी भाषेत सुलभ, सुंदर टीका करण्याचा आदेश जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना दिला. सद्गुरू आज्ञा प्रमाण मानून भागवतावरील एकादश स्कंधावर टीका रचना केली. त्यामुळे जनार्दन स्वामीं कृतार्थ झाले. व एकनाथांचा निरोप घेऊन ते दौलताबादला गेले.

    सद्गुरू आज्ञेनुसार एकनाथ महाराज वयाच्या पंचविसाव्या वर्षी आपल्या घरी पैठणला आले. वृध्द आजीआजोबांना अत्यानंद झाला. चक्रपाणींनी एकनाथ महाराजांचे लग्न जनार्दन स्वामींच्या आज्ञेनुसार गिरीजा नावाच्या कुलीन मुलींबरोबर मोठ्या थाटात करून उभयतांना शुभाशिर्वाद दिले. एकनाथ महाराजांनी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आज्ञेने व आजीआजोबा यांच्या आशिर्वादाने गृहस्थाश्रम स्वीकारला.व आपला प्रपंच परमार्थरूप बनविला.

      प्रपंचात राहून सामान्य माणसाला परमार्थ साधता येतो,हे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांनी दाखवून दिले.  

✍️ डॉ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)