कोल्हापुरात २७ एप्रिलला महागाईविरोधात रेशन बचाव समितीचा धडक मोर्चा; हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार
schedule23 Apr 26 person by visibility 158 categoryराज्य
कोल्हापूर: केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे वाढलेली प्रचंड महागाई आणि रेशनिंग व्यवस्थेतील त्रुटींच्या निषेधार्थ रेशन बचाव समितीच्या वतीने येत्या सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी कोल्हापुरात भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता ऐतिहासिक दसरा चौक येथून या मोर्चाला सुरुवात होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारने गॅस सिलिंडर ५०० रुपयांत देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच अनेक वर्षांच्या संघर्षानंतरही रेशनवर पाच जीवनावश्यक वस्तू अद्याप मिळत नसल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'मिशन सुधार' मोहिमेतंर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ३४ हजार ८३८ रेशनकार्ड धारकांचे धान्य बंद करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, तो कोल्हापूरच्या जनतेवर मोठा अन्याय असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये सभा घेऊन जनजागृती करण्यात आली आहे. या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय असणार आहे. रेशन बचाव समितीने यापूर्वी २२ फेब्रुवारी २००८ रोजी असाच भव्य मोर्चा काढून सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडले होते, त्याच धर्तीवर आता पुन्हा एकदा तीव्र लढा उभारण्यात येत आहे.
गॅस संपल्यानंतर त्वरित घरपोच गॅस मिळावा, रेशन कार्डवर पाच लिटर रॉकेल देण्यात यावे, गॅस सिलिंडरची किंमत ५०० रुपये करावी, गोडेतेल, तुरीची डाळ, साखर, ज्वारी आणि हरभरा डाळ या पाच जीवनावश्यक वस्तू रेशनवर उपलब्ध करून द्याव्यात, महागाई कमी करावी आणि प्राधान्य कुटुंब रेशन कार्डसाठी असणारी वार्षिक उत्पन्न मर्यादा दोन लाख रुपये करण्यात यावी, अशा मागण्या समितीने केल्या आहेत.
या मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन रेशन बचाव समितीचे अध्यक्ष विजय देवणे, सचिव रवींद्र मोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.