कागल येथील उरुसात ८० फुटांवर जॉइंट व्हील पाळणा अडकला; तब्बल चार तास सुटकेचा थरार,१८ जणांची सुखरूप सुटका
schedule25 Oct 25 person by visibility 170 categoryसामाजिक
कागल : श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरुसात दूधगंगा डेअरीजवळ उभारण्यात आलेला जॉइंट व्हील पाळणा तांत्रिक कारणाने वर जाऊन अडकल्याने या पाळण्यात बसलेले अठरा जण ऐंशी फुटांवर जाऊन तब्बल चार तास अडकले. रात्री ०८:३० वाजता हे पाळण्यात बसले होते. रात्री ११:३० पासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने एका एका व्यक्तीस खाली घेण्यास सुरुवात केली. रात्री १२:३० वाजता सर्व जण सुखरूप खाली आले. यामध्ये पाच महिला चार लहान मुले व नऊ पुरुषांचा समावेश होता. सुटकेचा हा थरार चार तास चालला.
पाळण्यात अडकलेले सर्व जण भीतीने चिंताग्रस्त बनले होते तर खालीनातेवाईक त्यांना धीर देण्यासाठी धडपडत होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या टर्न टेबल लॅडर गाडीने रात्री ११:०० च्या सुमारास एका-एका व्यक्तीस खाली उतरविण्यात सुरुवात केल्याने प्रशासनासह सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सायंकाळी ०७:०० वाजता हा पाळणा सुरू झाला. रात्री ०८:३० वाजेच्या सुमारास तांत्रिक कारणाने हे गोलाकार चक्र वर जाऊन अडकले. पाळणा चालकांनी तासभर प्रयत्न केला; पण यश आले नाही. शेवटी कोल्हापूरहून महापालिकेचे बचाव पथक बोलवून यात अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. याप्रसंगी उरूस समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.