तरुणांनी अमली पदार्थमुक्त भारताचे राजदूत बनावे; जनजागृती, प्रतिबंध आणि पुनर्वसनावर भर द्यावा : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
schedule24 Oct 26 person by visibility 146 categoryराज्य
◼️राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पोलीस दलांच्या राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ
मुंबई : अमली पदार्थांचे व्यसन ही समाजापुढील, विशेषतः तरुण पिढीसमोरील गंभीर समस्या आहे. अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्याबरोबरच त्यांची मागणी कमी करण्यासाठी जनजागृती, प्रतिबंध, पुनर्वसन आणि व्यसनाधीन व्यक्तींना आधार देणे आवश्यक आहे. तरुण पिढीने अमली पदार्थमुक्त भारताचे राजदूत बनून जनजागृती, प्रतिबंध आणि पुनर्वसनावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘नशामुक्त भारत – फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’ या राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीच्या शुभारंभप्रसंगी राज्यपाल बोलत होते.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोटारसायकल रॅलीला गुजरातकडे प्रस्थान देण्यात आले. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पोलीस दलांचे प्रतिनिधी तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी व जवान या रॅलीत सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याबरोबरच तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे हा या रॅलीचा उद्देश आहे. ही रॅली गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पोहोचणार आहे.
▪️राष्ट्रीय एकात्मतेच्या रक्षणासाठी सदैव सतर्क राहणे आवश्यक
राज्यपाल वर्मा म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी विविध संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण घडवून आणण्यात ऐतिहासिक आणि निर्णायक भूमिका बजावली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे सशक्त आणि एकसंध भारताचा पाया घातला गेला. राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी आपण सदैव सतर्क राहिले पाहिजे.
महाराष्ट्र पोलीस दल आपली कार्यकुशलता, समर्पण आणि उत्कृष्ट सेवेसाठी देशभरात ओळखले जाते. राज्यात शांतता, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच सुरक्षित व उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यात पोलिसांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
गडचिरोलीतील नक्षलवादी कारवाया नियंत्रणातही महाराष्ट्र पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गडचिरोली जिल्हा आता महत्त्वाचे पोलाद केंद्र म्हणून उदयास येत असून, तेथे विकासाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नरीमन पॉईंट येथे झालेल्या या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांच्यासह विविध राज्यांतील पोलीस अधिकारी,कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.