प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ कार्यशाळा उत्साहात
schedule10 Mar 26 person by visibility 120 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : येथील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींसाठी २६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence) या विषयावर दोन दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा ‘होप फाउंडेशन’च्या (Hope Foundation) ‘ग्लोबल कनेक्ट’ उपक्रमांतर्गत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR Fund) प्रायोजित करण्यात आली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका सविता राजेंद्र पाटील यांच्या कल्पनेतून आणि विशेष पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘लेक्सिस एआय’चे (Lexis AI) संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार शिंदे यांनी ही कार्यशाळा विद्यार्थिनींना केवळ १०० रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली.
या दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थिनींना आधुनिक तंत्रज्ञानाचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने संकेतस्थळ (Website) निर्मिती, मोबाईल अॅप तयार करणे, संगणकीय आज्ञावली (Coding) शिकणे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, अल्गोरिदम विषयी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वयं-अध्ययन (Self Learning) कसे करावे, या विषयांचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. या नाविन्यपूर्ण कार्यशाळेचा लाभ शाळेतील सुमारे ६७५ मुलींनी घेतला.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थिनींना तंत्रज्ञानाची जोड मिळावी, या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, कार्यशाळेनंतरही विद्यार्थिनींना सराव करता यावा यासाठी ‘लेक्सिस एआय’ हे शैक्षणिक अॅप वर्षभर उपलब्ध करून दिले जाणार आहे. विद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये तंत्रज्ञानाविषयी मोठी गोडी निर्माण झाली आहे.