कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ धावपटू सत्कार
schedule14 Jun 25 person by visibility 240 categoryसामाजिक

कोल्हापूर : जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर समजली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ ही नव्वद किलोमीटरची शर्यत कोल्हापूरच्या बारा धावपटूंनी यशस्वीरित्या पूर्ण केली. या सर्व धावपटूंचा सत्कार विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आणि आमदार जयंत आसंगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत आज करण्यात आला.
दक्षिण आफ्रिका हा देश जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक खडतर समजल्या जाणाऱ्या ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ स्पर्धेचं १९२१ सालापासून आयोजन करतोय. या स्पर्धेला यावर्षी अठ्ठ्यानव वर्षे पूर्ण झाली. जगातील सर्वात जुनी आणि अत्यंत कठीण अशी ही नव्वद किलोमीटरची स्पर्धा पिटरमारिट्सबर्ग ते डर्बन या मार्गावर घेण्यात आली. जगभरातील विविध देशांतून पंचवीसशे हून अधिक धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. भारतातील ४०० पेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता. यात ५० महिलांचा समावेश होता. कोल्हापूरच्या चेतन चव्हाण, अमोल यादव, दिलीप जाधव, सचिन बुरसे, स्वरूप पुजारी, विजय पाटील, आम्रपाल कोहली, सुषमा रेपे, डॉक्टर केतकी साखरपे, डॉक्टर पराग वाटवे आदी १२ धावपटूंनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. यामध्ये दोन महिलां धावपटू होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने सराव, पोषण नियोजन आणि मानसिक तयारी यांचा समन्वय साधत ही महान स्पर्धा पूर्ण करण्यात त्यांनी यश मिळवले.
कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन केवळ लांब अंतराची शर्यत नसून, ती शरीर, मन आणि इच्छाशक्तीची मोठी कसोटी असते. यंदा अधिक आव्हानात्मक असलेल्या स्पर्धेच्या मार्गात सुमारे बाराशे पन्नास मीटर चढ उतार अडथळे होते, दोन ते चौदा अंश तापमान होतं. कोवीस हिल, फिल्ड्स हिल, बोथाज हिल,इनचंगा, लिटल पॉली, पॉली शॉर्टस असे सात मोठे डोंगर व बऱ्याच छोट्या मोठ्या टेकड्या स्पर्धकांना पार कराव्या लागल्या. आज विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी, ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ स्पर्धा आणि स्पर्धेतील खडतर प्रवासाची त्यांच्याकडून माहिती घेतली. सर्वांचं अभिनंदन केले. त्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी आमदार जयंत आसंगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत सर्वांचा शाल आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
यावेळी ही स्पर्धा पार केलेले धावपटू आम्रपाल कोहली, डॉक्टर केतकी साखरपे यांनी स्पर्धेतील अनुभव सांगितले. या स्पर्धेतील नव्वद किलोमीटर चे अंतर अगदी सात तास एक्कावन मिनिटामध्ये यशस्वीरीत्या पार केलेल्या अमोल यादव यांनी आमदार सतेज पाटील यांचे आभार मानले. सत्कारानंतर आमदार सतेज पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, माजी उपमहापौर संजय मोहिते, उत्तम फराकटे आदी उपस्थित होते.