‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम ; दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला
schedule20 Oct 25 person by visibility 55 categoryराज्य

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या वतीने यंदा राज्यभर दहा ठिकाणी व दिल्लीतही ‘दिवाळी पहाट’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क, दादर येथे २१ ऑक्टोबर रोजी आणि कालिदास नाट्यगृह (मुलुंड) येथे २२ ऑक्टोबरला दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम साकारले जात आहेत.
दादर येथे आयोजित कार्यक्रमात जगदिश खेबुडकर, ग. दि. माडगुळकर व मंगेश पाडगांवकर यांच्या गाजलेल्या चित्रपट गीत व भावगीतांचा बहारदार कार्यक्रम ‘दिवाळी पहाट त्रिवेणी संगीत’ या विशेष संकल्पनेवर आयोजित सादरीकरण करण्यात येणार आहे. ख्यातनाम गायक दत्तात्रय मेस्त्री, अभिषेक नलावडे, प्रसिद्ध गायिका शाल्मली सुखटणकर, सोनाली कर्णिक, निवेदक अमित काकडे हे सादरीकरण करणार आहेत.
कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या बहारदार गीतांचा ‘दीप उत्सव दिवाळी पहाट’ या विशेष संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अजित परब, अभिषेक नलावडे, गायिका शाल्मली सुखटणकर व प्राजक्ता सातर्डेकर सहभागी होतील. निवेदन मिलिंद कुलकर्णी यांचे असून, संगीत संयोजन दीपक कुमठेकर आणि अमित गोठीवरेकर यांचे आहे.
सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, अधिकाधिक रसिकांनी या सांगीतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.