दूध उत्पादकांच्या श्रमामुळे ‘गोकुळ’ची प्रगती : नविद मुश्रीफ; गोकुळ दूध संघाची राधानगरी तालुका संपर्क सभा
schedule30 Aug 25 person by visibility 142 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी संलग्न राधानगरी तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा शनिवार दि.३० ऑगस्ट रोजी आनंद पॅलेस मंगल कार्यालय, शेळेवाडी ता.राधानगरी येथे संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळ व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली.
सभेत मार्गदर्शन करताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गोकुळची यावर्षीची वार्षिक उलाढाल ४ हजार कोटी इतकी झाली असून ५१२ कोटीच्या ठेवी झाल्या आहेत. हे यश दूध उत्पादकांच्या श्रमांमुळे शक्य झाले आहे. आज दूध उद्योगाच्या क्षेत्रामध्ये अमूल दूध संघानंतर गोकुळ दूध संघाचे नाव विशेष सन्मानाने घेतले जाते. गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून भविष्यातही हे प्रयत्न अधिक प्रमाणात राबविण्यात येतील. संघाने २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले असून, म्हैस दूध वाढीसाठी संघामार्फत विविध सेवा व सुविधा राबवल्या जात आहेत. त्याचा लाभ जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी घ्यावा, असे आवाहन केले. तसेच यामुळे म्हैस दुधाचे प्रमाण आणखी वाढेल व दूध उत्पादकांना चांगला फायदा मिळेल. संघामार्फत येत्या काळात रेडी टू इट या प्रकारचा ओली व सुकी वैरण निर्मितीचा प्रकल्प सुरू करणार आहोत. यामुळे जनावरांच्या पोषणाचा प्रश्न सुटेल आणि दूध उत्पादनात वाढ होईल. गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांना १ रुपयामधील ८२ पैसे थेट दूध उत्पादकांच्या हाती देतो. त्यामुळे गोकुळ हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा संघ आहे.
यावेळी बोलताना संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळ ने नेहमीच दूध व्यवसायाला चालना देण्याचे काम केले असून गेल्या चार वर्षात अनेक सभासद हिताचे निर्णय घेतला आहे. राधानगरी तालुक्यातून म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम योजना प्रभावीपणे राबवून म्हैस दूध संकलन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सुरवात दीपप्रज्वलनाने करून संचालक अभिजित तायशेटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व संचालक किसन चौगले यांनी प्रस्ताविक केले. तसेच ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले व संचालक राजेंद्र मोरे यांनी आभार मानले.
संपर्क सभेत दूध संस्था प्रतिनिधींनी विविध मागण्या मांडल्या. यावेळी म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ केलेबद्दल, इमारत अनुदान वाढ तसेच संस्था कर्मचारी यांना प्रोत्साहानात वाढ केल्याबद्दल तसेच उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाचे अभिनंदन ठरावाने करण्यात आले. तसेच किसान विमा पॉलिसीअंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत जनावरांच्या मालकांना विमा धनादेशांचे वाटपही करण्यात आले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, अधिकारी तसेच राधानगरी तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.