सांगलीत महाराष्ट्र राज्य फिडे रेटिंग निवड बुद्धिबळ स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद; राज्यातील २५० खेळाडूंचा सहभाग
schedule14 Sep 26 person by visibility 175 categoryक्रीडा
सांगली : जी एच रायसोनी नागपूर व कल्पना फौंडेशन नागपूर पुरस्कृत, सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'h2e पॉवर सिस्टिम प्रस्तुत १५ वर्षाखालील खुली आणि मुलींच्या स्वतंत्र फिडे रेटिंग निवड बुद्धिबळ स्पर्धा' सांगलीतील रेशीमगाठी सांस्कृतिक हॉल, स्फूर्ती चौक येथे दि. ११ सप्टेंबरपासून थाटात सुरू झाली आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेस महाराष्ट्रभरातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून, राज्यातील २४ जिल्ह्यांतून निवड झालेले तब्बल २५० खेळाडू यामध्ये आपले बुद्धीकौशल्य दाखवत आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन संतोष पाटील (माजी सभापती, स्थायी समिती सा.मि. कु.महानगरपालिका) यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी राधेय फौंडेशनचे प्रमुख डॉ. गणेश चौगुले, देशपांडे बिल्डर्स समूहाचे ह्रिषीकेश देशपांडे, सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष तथा चितळे उद्योग समूहाचे प्रमुख गिरीश चितळे, सचिव चंद्रकांत वळवडे, मुख्य पंच विवेक सोहनी, केपीज चेस अकॅडेमीचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक विजयकुमार माने, तसेच आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर, करण परीट आणि अमेय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) प्राप्त क्लासिकल मानांकन मिळवण्यासाठी १५ वर्षाखालील खेळाडूंसाठी ही सुवर्णसंधी ठरत आहे. ही स्पर्धा फिडेच्या स्विस सिस्टिम प्रमाणे ८ फेऱ्यांमध्ये खेळवली जात असून, यात ६० मिनिटे आणि ३० सेकंद बोनस या वेळ प्रणालीचा वापर केला जात आहे.
खुल्या गटात ११४ आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंसह ५६ इतर खेळाडू आणि मुलींच्या गटात ५० मानांकन प्राप्त खेळाडूंसह २८ बिगरमानांकित खेळाडू सहभागी झाल्यामुळे स्पर्धा अतिशय चुरशीची आणि आव्हानत्मक झाली आहे.
या स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४ मुले व ४ मुलींची तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकाठी निवड केली जाणार असून, हे निवड झालेले खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतील.
खुल्या गटात आयान सोमाणी (पुणे), विश्वादित्य अवस्थी (नागपूर), अथर्व सोनी (ठाणे), विवान सोनी (कोल्हापूर), तसीन ताडवी (जळगाव), भुवन शितोळे (पुणे), आदित्य चव्हाण (सांगली), हित बलदवा (कोल्हापूर) आणि रायण मर्चन्ट (मुंबई उपनगर) यांसारखे नामांकित खेळाडू खेळत आहेत. तसेच मुलींच्या गटात WCM निहिरा कौल (पुणे), AIM वाघळे भूमिका (छ. संभाजीनगर), साई पाटील (पुणे), प्रिशा मर्गज (मुंबई), परिधी गांधी (बुलढाणा), मिशका त्रिपाठी (मुंबई उपनगर), सान्वी गोरे (सालापूर), प्रणिता भावा (मुंबई उपनगर), मयंका राणा (पालघर) आणि सम्रादणी पाटील (सातारा) या प्रतिभावंत खेळाडूंचा सहभाग आहे.
स्पर्धेचा यशस्वी संचलन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी (रत्नागिरी), आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर (सांगली), राष्ट्रीय पंच करण परीट (इचलकरंजी), विजयकुमार माने (सांगली), अपर्णा शिंदे (सातारा), यश लोहाना (कराड), रोहित पोळ (इचलकरंजी), राज्य पंच नाझिया पटेल (मिरज) आणि अनिता भोसले जांभळी हे मुख्य पंच म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. सांगलीत आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर झळकण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली असल्याची माहिती स्पर्धा संयोजक गिरीश चितळे आणि संघटना सचिव चंद्रकांत वळवडे यांनी दिली आहे.